दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती रविवारी अचानक बिघडली. त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून प्रकृती सध्या स्थिर आहे. सोनिया गांधी यांना सौम्य ताप आल्याचे सांगण्यात येत आहे.
सोनिया गांधी गेल्या काही दिवसांपासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत आहेत. कोविडनंतर त्यांना बऱ्याचदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी दोनवेळा कोरोना संसर्गात सापडल्यानंतर त्यांना सतत आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी त्यांच्यावर केवळ सर गंगाराम ऊग्णालयात उपचार सुरू होते. या वषीच्या मार्चमध्येही सोनिया गांधींना तापाच्या तक्रारीनंतर सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी सध्या राजकारणात अतिशय सक्रिय भूमिका बजावताना दिसत आहेत. नुकत्याच मुंबईत झालेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत सोनिया गांधीही सहभागी झाल्या होत्या. यापूर्वी बेंगळूर येथे झालेल्या विरोधी एकजुटीच्या बैठकीलाही त्या उपस्थित होत्या. गेल्या दोन-चार दिवसात झालेल्या अधिक प्रवासामुळे त्यांना त्रास झाल्याचा दावा पक्षातील सूत्रांनी केला आहे.









