दोन पिल्लांची जबाबदारी स्वीकारणार सरकार
वृत्तसंस्था/ रोम
इटलीतील सॅन बेनेडेटा या राष्ट्रीय उद्यानानजीक एका इसमाने मार्सिकन या विलुप्त प्रजातीतील अस्वलाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. इटलीत अस्वलांची शिकार करणे गुन्हा आहे. इटलीचे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. अस्वल माझ्या खासगी मालमत्तेत शिरले होते. अस्वलाला पाहून घाबरून गेलो आणि गोळी झाडली होती. अस्वलाचा जीव घेण्याचा उद्देश नव्हता असा दावा संबंधित व्यक्तीने केला आहे.
अमरेना नाव असलेले अस्वल स्वत:च्या दोन पिल्लांसोबत सॅन सेबेस्टियानो देई मार्सीमध्ये दिसून आले होते. गोळी झाडण्यात आली तेव्हा अस्वलासोबत तिची दोन पिल्लं देखील होती. मारले गेलेल्या अस्वलाला अमरेना नाव देण्यात आले होते. अस्वलांची ही प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. ब्लॅक चेरीला अमरेना म्हटले जाते. अमरेना हे अस्वलांच्या पसंतीचे खाद्य आहे. याचमुळे या अस्वलाला अमरेना नाव देण्यात आले होते.
इटलीचे पर्यावरण मंत्री तसेच पर्यावरण कार्यकर्त्यांसोबत स्थानिक लोकांनीही अस्वलाच्या हत्येवर निराशा व्यक्त केली आहे. इटलीच्या अब्रुजो, लाजियो आणि मोलिसे येथील राष्ट्रीय उद्यानाने हत्येची निंदा केली. अमरेना अस्वल शांत स्वभावाचे होते. त्याने कधीच कुठल्याही माणसासाठी समस्या निर्माण केली नव्हती. यामुळे या घटनेला योग्य ठरविले जाऊ शकत नसल्याचे म्हटले गेले आहे.
मार्सिकन मादी अस्वलाची हत्या गंभीर घटना आहे. अस्वलाच्या पिल्लांची सुरक्षा करणे आता महत्त्वाचे आहे. ही पिल्लं आत्मनिर्भर नसल्याने त्यांचा जीव जोखिमीत सापडू शकतो, याचमुळे त्यांचा शोध सुरू करण्यात आल्याचे इटलीचे पर्यावरणमंत्री गिल्बर्टो पिचेटो यांनी सांगितले आहे.









