शिरोळ, हातकणंगले तालुके कोरडेच; पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली; कृषि पंप सुरु करून पिकांना जीवदान देण्याचा प्रयत्न; जिह्याच्या पश्चिम भागात वळीव सदृष्य पाऊस
कृष्णात चौगले कोल्हापूर
अतिवृष्टीचा काळ समजल्या जाणाऱ्या संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाऐवजी उन्हाच्या तीव्र झळा अंगावर झेलायला लागल्या. ऑगस्टमध्येच ऑक्टोबर हिट जाणवल्यामुळे जिह्यातील खरीप हंगाम संकटात सापडला आहे. पावसाअभावी खरीप पिकांची वाढ पुर्णपणे खुंटली असून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. पावसाळ्याच्या सुऊवातीस महावितरणने कृषीपंपांचा बंद केलेला वीज पुरवठा पुन्हा सुरू केला असून पिकांना पाणी देऊन जगविण्याची शेतकऱ्यांकडून धडपड सुरू आहे. पण ज्या ठिकाणी सिंचनाची सोय उपलब्ध होत नाही, अशा माळरानावरील खरीप पिके कोमेजली आहेत. अजून काही दिवस पावसाने ओढ दिल्यास हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची शक्यता आहे.
खरीप हंगाम हा पुर्णपणे मोसमी पावसावर अवलंबून आहे. पण गेल्या अनेक वर्षापासून मोसमी पावसाच्या लहरीपणामुळे वर्षानुवर्षे जिह्यातील खरीप हंगाम संकटात सापडत चालला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे माळरानावरील खरीप पिके पूर्णपणे कोमेजली आहेत. नदी, विहीरीचे पाणी पाजण्याची सोय असलेल्या ठिकाणी पिकांना पाणी देणे शक्य आहे. पण कृषी पंपांचा वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू नसल्यामुळे बळीराजाचे पावसाकडे डोळे लागले आहेत. यावर्षी पंधरा ते वीस दिवस उशीरा मोसमी पावसाला सुरवात झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी धुळवाफ पेरणी केलेल्या खरीप पिकांची दुबार पेरणी करावी लागणार की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. भातरोप लावणही पंधरा दिवसांनी लांबणीवर पडली. त्यानंर सलग पंधरा ते वीस दिवस संततधार पाऊस झाल्यामुळे पिकांची चांगली उगवण होऊन चांगली वाढ झाली आहे. पण ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत. सोयाबिन, भुईमुग, भात, नाचना आदी खरीप पिकांनी मान टाकली आहे. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच पावसाऐवजी कडक उन्हाच्या तडाख्यामुळे कोमेजली आहेत.
1 लाख 92 हजार 633 हेक्टर खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र
कृषी विभागाच्या अंदाजानुसार जिह्यामध्ये 1 लाख 92 हजार 633 हेक्टर खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. यामध्ये भात, भुईमूग, नाचणी, सोयाबीन, खरीप ज्वारी व कडधान्यांचा समावेश आहे. यंदा पावसाने महिनाभरापासून दडी मारल्यामुळे खरीपातील सर्वच पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे. जिह्यात सध्या भाताचे पिक वाढीच्या ते फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. पिक परिस्थिती समाधानकारक आहे. पण जिह्याच्या पूर्वेकडील व पश्चिमेकडील तालुक्यातील माळरान व डोंगरमाथ्यावरील पिकांची वाढ पुरेशा पावसाअभावी खुंटलेली आहे. त्यामुळे आगामी काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.
कृषी विभाग सुस्त अन् दिशाहिन
कार्यालयामध्ये बसून खरीपाची आकडेवारी आणि पिक परिस्थितीचा अहवाल घेणारा शासनाचा कृषी विभाग सुस्त आणि दिशाहिन झाला आहे. शेतकऱ्यांना सध्या कोणती अडचण आहे, पिकांची काय स्थिती आहे, कोणत्या किडीचा प्रादुर्भाव आहे, पावसाअभावी वाढलेल्या हुमणी किडीसाठी शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करावे, कृषी विभागाकडून दिली जाणारी हुमणी किडनाशक औषधे गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात काय ? की एजंटांच्या घरीच औषधांचा बाजार भरवला जातो ? याबाबत कृषि विभागाचे अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. ठराविक पठडीतील शेतकऱ्यांना औषधे पुरवली की कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे काम संपले असेच काहीअंशी चित्र आहे. जिल्हा परिषदेचा कृषी विभाग तर ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ बनला आहे. शेतकऱ्यांना केवळ वैयक्तिक लाभाच्या योजना पुरवल्या की आपले काम झाले अशी तेथील अधिकाऱ्यांची मानसिकता तयार झाली आहे.
शिरोळ तालुक्यातील पिक सर्व्हेक्षणासाठी समिती
अपवाद वगळता ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस न पडल्याने खरीप पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. चालू वर्षाच्या अपेक्षित उत्पादनात गत सात वर्षांच्या सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत 50 टक्के पेक्षा घट अपेक्षित असेल तर येणाऱ्या पिक विमा नुकसान भरपाईची 25 टक्के पर्यंत आगाऊ रक्कम शेतक्रयांना देण्याची तरतूद आहे. विमा कायद्यातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना आगाऊ 25 टक्केपर्यंत नुकसान भरपाई देण्याबाबत निश्चित करण्याचे पत्र राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी काढले आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला आहे त्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झालेला आहे. परिणामी उत्पादनात मोठी घट येणार आहे. किमान 21 दिवसांचा खंड पडला तर विमा कंपनीस नुकसान भरपाई देण्याची जोखीम आहे. त्यामुळे संयुक्त पीक सर्व्हेक्षणाचे आदेश काढण्याची मागणी बीआरएस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ शिरोळ तालुक्यातील पीक सर्व्हेक्षण करण्याचे आदेश काढले आहेत. तालुका कृषि अधिकारी या समितीचे अध्यक्ष असून संबंधित मंडल अधिकारी सदस्य सचिव आहेत. तर विमा कंपनी प्रतिनिधी, संबंधित कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक समिती सदस्य आहेत. पण पावसाअभावी जिह्यातील अन्य तालुक्यातही पिकांचे मोठे नुकसान झाले असताना जिल्हा प्रशासनाने केवळ शिरोळ तालुक्यातील पिक सर्व्हेक्षणसाठी समिती नियुक्त केली आहे.








