चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयानाचे यशस्वी लँडिंग झाले आणि त्यानंतर अवघ्या एका आठवड्यातच भारताने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य एल-1’ मिशन लॉंच केलं आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. अवकाशात वेधशाळा उभारून सोलर विंडचा अभ्यास करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. ही सौर मोहीम यशस्वी व्हावी अशा सर्व भारतीयांच्या इस्रोला शुभेच्छा आहेत. ‘आदित्य एल1’ चा प्रवास 125 दिवसांचा असणार आहे. या दरम्यान सूर्याचा केला जाणारा अभ्यास हा मानव जातीसाठी खूपच महत्त्वाचा ठरेल. हवामान बदलाचे परिणाम आणि वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर असा अभ्यास सुरू होणे, अमेरिकेच्या नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या बरोबरीने भारतासारखा देश प्रगती करणे याला खूपच महत्त्व आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून सूर्याकडे प्रक्षेपित झालेल्या या उपग्रहाच्या प्रवासाकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. पृथ्वीपासून सूर्याचे अंतर 15.1 कोटी किलोमीटर आहे आणि आदित्य एल 1ला पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतर गाठायचं आहे. जे सूर्य आणि पृथ्वीमधील अंतराच्या अवघे एक टक्के आहे. पण इतक्या अंतरावरूनसुद्धा सूर्याकडे नजर लावून बसणे मानवी शक्तीच्या बाहेरच आहे. चार महिन्यानंतर लांग्राजियन बिंदू म्हणजे जेथे सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात समतोल साधलेला आहे अशा ठिकाणावरून हा उपग्रह सूर्याभोवतीच्या विशिष्ट कक्षेत भ्रमण करणार आहे. एका अर्थाने वैज्ञानिक उपकरणांच्या साहाय्याने सूर्याकडे पाहण्याची आपली क्षमता विकसित करून तिथल्या घडामोडींचे बारकावे जगाला ज्ञात करून देणारी अशी ही मोहीम आहे. सूर्याच्या वातावरणाच्या सर्वात बाह्य थराला कोरोना असे संबोधले जाते. यातून सूर्यावरील प्रभावित अणूंची वाफ, अंतरिक्षातील कण आणि चुंबकीय क्षेत्र बाहेर फेकले जातात. या कोरोनल मास इंजेक्शनचा अभ्यास करून सूर्याच्या कोरोनाचे तापमान त्याच्या पृष्ठभागापेक्षाही अधिक का असते, ते कोणत्या प्रक्रिया घडल्यामुळे होते, त्यामागील कारणे काय, सौरवायूंचा उगम आणि त्यांचा सूर्याच्या प्रभामंडळावरील परिणाम काय, या सगळ्याचा अभ्यास आदित्य एल-1 द्वारे केला जाणार आहे. अशाप्रकारे एक प्रयोगशाळाच इस्रोने सूर्याच्या आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात समतोल साधलेल्या भागात पाठवून देऊन माहितीचा खजिना जमवण्याची तयारी चालवली आहे. या अभ्यासातून सूर्याच्या अंतर्गत भागातील हालचालींची आवश्यक ती सर्व माहिती मिळेल, जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी पोषक परिस्थिती निर्माण होण्यामागे सूर्याचे महत्त्व किती आहे, याविषयीचा अभ्यासही हाती लागेल. वातावरणावर सूर्यापासून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेतील चढउतारामुळे बराच परिणाम होत असतो त्याचा जर अभ्यास केला गेला तर पृथ्वीवरील हवामानाचे अंदाज अधिक चांगल्या प्रकारे मांडता येतील. पृथ्वीवरील वातावरणात अनेकदा ज्या अनाकलनीय आणि गुंतागुंतीच्या प्रक्रिया घडतात त्यांचा अभ्यास करून भविष्यातील नुकसान टाळता येणे शक्य होईल. सध्या पृथ्वीवरून सूर्याचा अभ्यास होतो. मात्र प्रत्यक्षात सूर्याच्या जवळ जाऊन अभ्यास करणे ही फार महत्त्वाची गरज होती. चांद्रयानाच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या कार्याबद्दलचा आदर जगात अधिक वाढला. गेल्या काही वर्षांमध्ये जगातील अनेक देशांना आपले उपग्रह प्रक्षेपित करून आपल्याला हव्या त्या कक्षेत सुस्थितीत पाठवण्यासाठी भारतीय अंतराळ संस्थेचा फार मोठा उपयोग झाला आहे. जगातील विकसित राष्ट्रांपेक्षा कमी किमतीमध्ये त्यांच्याहून अधिक अचूक प्रक्षेपण भारतातून होते ही आतापर्यंतची या संस्थेची ख्याती आहे. त्यांच्या या सौर मोहिमेने जगाला या क्षेत्राकडे अधिक आश्वासकपणे पाहतानाच भारताकडे सुद्धा तितक्याच आश्वासकपणाने पाहण्यासाठी भाग पाडले आहे. 21 नोव्हेंबर 1963 रोजी भारताने आपले पहिले रॉकेट लाँच केले. ते केरळच्या थुंबा इथून. यानंतर आंध्र प्रदेशातली श्रीहरिकोटा येथून 9 ऑक्टोबर 1971 रोजी रोहिणी 125 हे साउंडिंग रॉकेट प्रक्षेपित झालं आणि तेव्हापासून भारताच्या सगळ्या अवकाश मोहिमांचं प्रक्षेपण श्रीहरिकोटा इथूनच होत आलं आहे. श्रीहरिकोटाचं सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्या म्हणजे त्याचे भौगोलिक स्थान होय. 1960 साली सुरू झालेल्या भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांनी त्यांचे जवळचे सहकारी एकनाथ चिटणीस यांना उपग्रह प्रक्षेपणासाठी सुयोग्य जागा शोधण्याची जबाबदारी दिली होती. त्यांनी मार्च 1968 मध्ये आंध्र प्रदेशच्या उद्योग संचालकांच्या मदतीने संभाव्य ठिकाणांचं सर्वेक्षण केलं आणि नकाशे तयार केले. ऑगस्ट महिन्यात विक्रम साराभाईंनी श्रीहरिकोटाची हवाई पाहणी केली आणि ऑक्टोबरमध्ये 40 हजार एकर जमिनीचं अधिग्रहणही झालं. श्रीहरिकोटा विषुववृत्ताजवळ आहे आणि त्याला पृथ्वीच्या रोटेशनचाही फायदा घेता येणं शक्य आहे. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. तिचा वेग असतो ताशी 8 हजार किलोमीटर. जेव्हा आपण पृथ्वी फिरतेय त्याच दिशेने रॉकेट लाँच करतो तेव्हा पृथ्वीच्या फिरण्याच्या वेगामुळे रॉकेटला अतिरिक्त वेग मिळतो. सेकंदाला 450 मीटर इतकी ती अतिरिक्त गती असते. विशेष म्हणजे यासाठी कुठलेही जास्तीचे इंधन वापरले जात नाही. अमेरिकेचे केनेडी स्पेस सेंटर, फ्रेंच गयानामधले ग्रोव्ह स्पेस स्टेशन या जागासुद्धा विषुववृत्ताजवळच आहेत. भारताने आजवर अनेक कम्युनिकेशन सॅटेलाईट्स लाँच केली आहेत. ही सॅटलाईट्स ज्या कक्षेत फिरतात ती कक्षा साधारणपणे विषुववृत्ताच्या वर असते. त्यामुळे विषुववृत्ताच्या जवळ असलेल्या ठिकाणाहून प्रक्षेपण करणे फायद्याचे ठरते. एखाद्या यशाच्या मागे किती मोठे विचार असतात हेच यातून दिसते. भारत जगातील इतर तीन स्पर्धक राष्ट्रांच्या बरोबरीने त्यांच्याहून फार कमी खर्चात मोहिमा आखत आहे. एखादे रॉकेट भरकटले तर ते जवळपास लोकवस्तीच नसल्यामुळे समुद्रात कोसळण्याची श्रीहरीकोटामध्ये सोय आहे. अशाच पद्धतीचे केंद्र लवकरच भारतात सुरू होण्याची आशा आहे. तामिळनाडूच्या कुलशेखरपट्टीनम या जागेचा विचार सुरू आहे. अंतराळ विज्ञान क्षेत्रात सुरू असणारी ही प्रगती लक्षात घेतली तर एक भारतीय म्हणून आपली छाती अभिमानाने फुलून येते.








