अध्याय एकोणतिसावा
अध्यायाला सुरुवात करताना नाथमहाराज सद्गुरूंचे महात्म्य सांगत आहेत. ते म्हणतात, सद्गुरु तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही दयेचे महासागर आहात. ज्याप्रमाणे महासागराची खोली चटकन कळत नाही त्याप्रमाणे तुमच्या कृपेचा ठाव सहजी लागण्यासारखा नाही. शरीरात असलेला आत्मा त्रिगुणांनी वेढलेला असल्याने जीवभावास प्राप्त झालेला असतो आणि त्यामुळे हे शरीर म्हणजेच मी, अशी त्याची खात्री पटलेली असते.
तुमच्या कृपेने तुम्ही जीवाला हे शरीर म्हणजे तू नसून आत्मा ही तुझी खरी ओळख आहे हे पटवून देता आणि त्याचा जीवभाव नाहीसा करून त्याला देहाच्या जोखडातून मुक्त करता. त्यावेळी जीवाची देहबुद्धी नाहीशी होते. मी म्हणजे हा देह ह्या कल्पनेतून, मी कर्ता आहे, माझ्यामुळे सर्व कुटुंबातील सर्व मंडळींचे पालनपोषण होत आहे अशा एक ना अनेक समज, गैरसमजातून जीवाने अनेक उपाधी मागे लावून घेतलेल्या असतात. त्यातून सद्गुरूराय तुम्ही त्याची सुटका करता त्यामुळे हे कृपानिधी, तो जीव भवसागर तरून जातो. तो खरी धरून बसलेली त्याची ह्या जन्मीची नाम रूपात्मक ओळख खोटी आहे हे त्याला पटवून देता, त्यामुळे त्याच्यादृष्टीने ती संपूर्ण नाहीशी होते.
साहजिकच त्याचबरोबर त्याची सध्याच्या देहाची जात व गोत्रही संपुष्टात येते. जीवाला इथपर्यंत आणल्यानंतर त्यापुढे जाऊन सर्वजण दिसायला वेगवेगळे असले तरी त्या सर्वांच्यात असलेला आत्मा एकच आहे हे तुम्ही त्याच्या लक्षात आणून देता त्यामुळे सर्वजण एकसारखेच आहेत अशी त्याची खात्री पटल्याने त्याचा हा आपला, तो परका असा आपपर भाव नष्ट होतो.
हे सगळे तुम्ही शिष्याच्याबाबतीत कृपाळूपणाने घडवून आणता कारण तुम्ही त्याचे जिवलग आणि सगेसोयरे असता. अंधाऱ्या रात्री हजारो, लाखो चांदण्या आणि तारे ठळकपणे दिसत असतात पण जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा अंधार समूळ नष्ट झाल्याने तारे तारकाही निस्तेज होऊन दिसेनासे होतात. त्याप्रमाणे तुमची भेट झाल्यावर तुमची कृपादृष्टी शिष्याकडे वळली की, त्या तेजापुढे त्रिगुणातून निर्माण झालेला संसार शिष्याच्या नजरेला दिसेनासा होतो. त्रिगुणात्मक सृष्टी दिसणार नाही अशी व्यवस्था करून नंतर अद्वैत ब्रह्म तुम्ही त्याला दाखवता. शिष्याने आत्तापर्यंत ब्रह्म पाहिलेलेच नसते पण एकदा दिसल्यावर मात्र त्याची आणि ब्रह्माची कधीच ताटातूट होत नाही.
गर्भ खरं म्हणजे मातेच्या उदरातच असतो त्याप्रमाणे साधक तुमच्या उदरातच असतो. आई ज्याप्रमाणे उदरातल्या गर्भाची काळजी घेत असते त्याप्रमाणे आत्मज्ञान होण्यासाठी शिष्य लायक होईपर्यंत तुम्हीही शिष्याला जपत असता.
बाळाचा जन्म झाल्यावर माता त्याला शहाणपणाने वाढवते त्याप्रमाणे साधकाला तुम्ही तो सज्ञान होईपर्यंत जपत असता. तुम्ही त्याला सज्ञान केल्यावर त्याला मी तू पण आठवेनासे होते, जीवपण विसरले जाते आणि तो अद्वैताने भरून जाऊन परमात्मा होतो. असं तुमचं महात्म्य सांगावं तेव्हढं थोडंच पण एक नक्की आहे की, जोपर्यंत तुमची कृपादृष्टी होत नाही तोपर्यंत कितीही उपाय केले तरी परमार्थ घडत
नाही.
एकदा सद्गुरुकृपादृष्टी झाली की, मग मात्र परमार्थाची सर्व साधनं पळ काढतात आणि ब्रह्मनंदाने सर्व सृष्टी कोंदाटून जाते, साधकाला स्वानंद प्राप्ती होते. सद्गुरुकृपा झाली की, उपनिषदांचा मतितार्थ हातात येतो.
एव्हढे सांगून झाल्यावर नाथमहाराज त्यांचे सद्गुरू श्री जनार्दन महाराज ह्यांचे गुणगान गाताना म्हणतात, सद्गुरू तुमच्या कृपेनेच मी भागवतावर मराठीत टीका करू शकलो. मी ती टीका लिहित आहे असं आपलं म्हणायचं एव्हढच खरं म्हणजे तुम्हीच ती टीका माझ्या हातून लिहून घेत आहात. तुम्ही सांगताय तसं माझ्या हातून अक्षरं आपोआपच लिहिली जात आहेत.
क्रमश:








