पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंगचा प्रकार : आणखी एक जण फरारी
प्रतिनिधी/ बेळगाव
लोकायुक्त अधिकारी असल्याचे सांगून सरकारी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या बेळगावच्या तरुणाला बेंगळूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा आणखी एक साथीदार फरारी असून तोही बेळगाव जिल्ह्यातील राहणारा आहे.
बेंगळूर येथील विधानसौध पोलिसांनी संतोष कोप्पद, रा. बेळगाव याला अटक केली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांशी संपर्क साधून ब्लॅकमेल करण्यात येत होते. त्याचा आणखी एक साथीदार विशाल पाटील, रा. देशनूर, ता. बैलहोंगल हा फरारी असून त्याला अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
विशाल पाटीलवर यापूर्वी बैलहोंगल पोलीस स्थानकात ब्लॅकमेल प्रकरणी एफआयआर दाखल झाला होता. संतोष कोप्पद हा विशालचा शिष्य असून हे दोघे लोकायुक्तांच्या नावे सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ‘तुमच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आमच्याजवळ आहेत. तुमची फाईलच आमच्याकडे आली आहे. प्रकरण दडपण्यासाठी पैसे द्या, नहून तुमच्यावर कारवाई करू’ अशी धमकी देण्यात येत होती.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ब्लॅकमेल करण्यात येत होते. त्यावेळी अधिकाऱ्यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत लोकायुक्त पोलिसांनीही चौकशी सुरू केली होती. ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याचे लक्षात येताच विधानसौध पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पैसे देण्याचे सांगून पोलिसांनी विशालला अटक करण्यासाठी सापळा रचला होता. मात्र, त्याने स्वत: न जाता संतोषला तेथे पाठविले. संतोषला अटक करण्यात आली असून विशालचा शोध घेण्यात येत आहे.









