बोटींनी ढकलावे लागते बेट
अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यात ‘चिप्पेवा’ नावाचा तलाव आहे. त्यामध्ये एक तरंगणारे ‘बेट’ तयार होते. हे बेट 40 एकरात पसरले असून त्याचा पृष्ठभाग दलदलीचा व चिखलमय आहे. यामुळेच या बेटाला ‘चिप्पेवा फ्लोज फ्लोटिंग बोग’ असेही म्हणतात. इतरांपेक्षा अनोखे असलेले हे बेट लोकांसाठी अडचणीचे ठरल्यामुळे त्यांना दरवषी बोटीद्वारे हे बेट ढकलावे लागते. चिप्पेवा तलावावर एक मोठा पूल बांधला आहे. तलावाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूंना जोडणारा हा पूल एकमेव मार्ग आहे. या तरंगत्या बेटामुळे कधी कधी हा पूल थांबतो. त्यामुळे त्या पुलावरून लोकांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याशिवाय स्थानिक बोट चालकांनाही पुलावर जाण्यास अडचणी येतात. या कारणास्तव त्यांना दरवषी बोटीतून हे बेट खेचावे लागते.

दरवषी, डझनभर स्थानिक बोट मालक सरोवराच्या पूर्व आणि पश्चिम बाजूंना जोडणाऱ्या पुलापासून बेट दूर ढकलण्यासाठी एकत्र येत असल्याचे एका स्थानिक व्यक्तीने प्रसारमाध्यमांना सांगितले. असा प्रकार दरवर्षी करावा लागतो. सर्वांच्या प्रयत्नातून तरंगणारे बेट पुलावरून हटवले जाते. हे बेट नेहमीच तरंगत असल्याचे दिसत नाही. तलावातील हे अनोखे तरंगते बेट झाडांनी भरलेले आहे. जेव्हा जोरदार वारा वाहतो तेव्हा ही झाडे पालांसारखी काम करत असल्यामुळे बेट तरंगते. त्यामुळे हे बेट लोकांसाठी डोकेदुखी ठरते. बोटींनी हे बेट काढण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरत नाही. तरंगत्या बेटाला पुलापासून दूर ढकलण्यासाठी गेल्या वषी 25 बोटींचा वापर करण्यात आला होता.









