धूम्रपान आरोग्यासाठी हानीकारक असते. तरीही लोक धूम्रपान करणे सोडून देत नाहीत. भारतात धूम्रपानावरून अनेक प्रकारचे नियम लागू आहेत. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई आहे. याचबरोबर 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सिगारेटची विक्री करण्यास बंदी आहे. परंतु जगातील एका देशात केवळ 3 आणि 4 वर्षांची मुले राजरोसपणे धूम्रपान करत आहेत.
ज्या वयात मुले चॉकलेटसाठी हट्ट करतात, त्या वयात या देशातील मुले धूम्रपान करत आहेत. ते देखील स्वत:च्या आईवडिलांसमोर ते सिगारेटचे झुरके घेत आहेत. इंडोनेशियात मुलं कमी वयातच सिगारेटच्या आहारी गेल्याचे पहायला मिळते. ही मुले एका दिवसात दोन पाकिटपर्यंत सिगारेट ओढत असतात. या मुलांच्या पालकांनाही देखील याची कल्पना आहे. त्यांच्यासमोरच ही मुले आरामात धूम्रपान करत आहेत.

इंडोनेशियातील मुलांच्या या व्यसनाचा खुलासा कॅनडाच्या एका फोटोग्राफरने केला आहे. मिशेली सीयू नावाच्या या फोटोग्राफरने इंडोनेशियातील मुले कशाप्रकारे धूम्रपानाच्या आहारी गेली आहेत. हे दाखवून दिले आहे. केवळ तीन आणि चार वर्षांची मुले देखील तेथे धूम्रपान करत आहेत. लहान मुलांना धूम्रपान करताना पाहूनही त्यांचे आईवडील त्यांना रोखत नाहीत.
इंडोनेशियात धूम्रपान आता सर्वात मोठी समस्या ठरली आहे. या व्यसनाने प्रौढांसोबत मुलांनाही स्वत:च्या अधीन केले आहे. इंडोनेशिया हा देश तंबाखू उत्पादनात पाचव्या स्थानावर आहे. यामुळे येथे अनेक जाहिरातींचे प्रसारण होते. सरकार देखील यावर बंदी घालत नाही, कारण देशाच्या अर्थव्यवस्थेत याचे मोठे योगदान आहे. इंडोनेशियात 10-14 वयोगटातील बहुतांश मुले दरदिनी 3 सिगारेट ओढत असल्याचे एका अध्ययनात दिसून आले आहे. तर एकूण लोकसंख्येच्या 60 टक्के लोक धूम्रपान करतात.









