70 टक्के मते मिळवत जिंकली निवडणूक
► वृत्तसंस्था/ सिंगापूर
भारतीय वंशाचे थर्मन षणमुगारत्नम यांची सिंगापूरच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांना 70.4 टक्के इतकी मते मिळाली. दशकभरानंतर झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. तिरंगी लढतीत भारतीय वंशाचे माजी मंत्री थर्मन षणमुगारत्नम विजयी झाले. त्यांच्याविरोधात एन. कोक सोंग आणि टेन किन लियान हे अन्य दोन उमेदवार देशाच्या नवव्या राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत होते.
सिंगापूरमध्ये जन्मलेले भारतीय वंशाचे अर्थतज्ञ थर्मन षणमुगारत्नम यांनी गेल्या महिन्यात देशाची संस्कृती जगामध्ये ‘चमकत’ ठेवण्याची प्रतिज्ञा करत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली होती. 2001 मध्ये राजकारणात प्रवेश केलेल्या 66 वषीय थर्मन षणमुगारत्नम यांनी दोन दशकांहून अधिक काळ सत्ताधारी पीपल्स अॅक्शन पार्टीसोबत सार्वजनिक क्षेत्रातील पदांबरोबरच मंत्रिपदे भूषवली आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 27 लाखांहून अधिक लोकांनी मतदान केले. ही सिंगापूरची 12 वर्षांतील पहिली राष्ट्रपतीपदाची निवडणूक होती. 2017 मधील निवडणूक मलय उमेदवारांसाठी राखीव असल्याने बिनविरोध झाली होती. सिंगापूरमध्ये 2011 नंतरची ही पहिलीच अध्यक्षीय निवडणूक आहे. सिंगापूरमध्ये राष्ट्रपतीपदासाठी पहिली निवडणूक 28 ऑगस्ट 1993 रोजी झाली होती. सिंगापूरमध्ये अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना कठोर पात्रता प्रक्रियेतून जावे लागते.









