सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हिंदू विवाह कायद्यानुसार ज्या विवाहाला कायदेशीर मान्यता मिळालेली नाही, अशा विवाहसंबंधांतून जन्मलेल्या अपत्यांना देखील आईवडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सेदारी मिळणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले आहे. याचबरोबर हिंदू उत्तराधिका कायद्याच्या अंतर्गत हा अधिकार आता अमान्य विवाहातून जन्माला आलेल्या मुलांनाही मिळाला आहे.
अमान्य ठरणाऱ्या विवाहातून जन्माला आलेल्या अपत्यांना आईवडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सेदारी मिळावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने अमान्य विवाहातून जन्माला आलेल्या मुलांनाही आईवडिलांचे वैध अपत्य म्हणून दर्जा मिळेल आणि अशाप्रकारे ते त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीचे हिस्सेदार ठरतील असे स्वत:च्या निर्णयात नमूद केले आहे.
हिंदू विवाह अधिनियम 1955 चे कलम 16 चे पोटकलम 1 अंतर्गत अमान्य विवाहाच्या अंतर्गत पती-पत्नींची मुले कायद्याच्या दृष्टीकोनातून वैध आहेत. पोटकलम 2 अंतर्गत अमान्य विवाहातून जन्माला आलेली मुले वैध आहेत, याचमुळे त्यांना त्यांच्या आईवडिलांच्या संपत्तीत हक्क मिळणार असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.
हिंदू विवाह अधिनियम 1955 मध्ये अमान्य विवाहाची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे. विवाहबंधनात अडकलेला मुलगा किंवा मुलगी निर्धारित वयापेक्षा कमी वयाचे असल्यास संबंधित विवाह अमान्य ठरतो. मुलगा किंवा मुलीपैकी कुणीही एकजण पूर्वीपासून विवाहित असल्यास देखील संबंधित विवाह अवैध ठरतो. तसेच कायद्यानुसार विवाह केला नसल्यास त्यालाही मान्यता मिळत नाही. कुणा एका जोडीदाराला धमकावून किंवा घाबरवून तसेच फसवणूक करून विवाहासाठी तयार केले असल्यास तो विवाह देखील अमान्य ठरतो.









