सेन्सेक्स 555 अंकांनी वधारला : ऊर्जा, धातू निर्देशांकांनी राखली तेजी
वृत्तसंस्था/ मुंबई
धातू आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय शेअरबाजार शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी दमदार तेजीसोबत बंद झाल्याचा पाहायला मिळाला. भेल या कंपनीचे समभाग सर्वाधिक 11 टक्के इतके वधारताना दिसले. जीडीपीची आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतील आकडेवारी उत्साहवर्धक राहिल्याने बाजारात त्याचे पडसाद पहायला मिळाले.
शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 555 अंकांच्या तेजीसह म्हणजेच 0.86 टक्के वाढीसह 65,387 अंकांवर तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 181 अंक अर्थात 0.94 टक्के इतका वाढत 19435 अंकांवर बंद झाला होता. वर म्हटल्याप्रमाणे भेलचे समभाग अधिक चमकले होते. सोबत एनटीपीसी आणि जियो फायनान्शीयलचे समभाग सुद्धा प्रत्येकी 1 टक्का वाढत बंद झाले होते. विविध क्षेत्राच्या निर्देशांकावर नजर टाकल्यास फार्मा क्षेत्राचा मात्र निर्देशांक घसरणीत होता. इतर सर्व क्षेत्रांचे निर्देशांक अर्थातच तेजीसह बंद झाले. धातू, ऊर्जा, ऑटो, ऑइल अँड गॅस आणि बँकांचा निर्देशांकही 1 ते 2.7 टक्के या प्रमाणात वाढत बंद झाले होते. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांक 0.7 टक्के इतका वाढत बंद झाले.
या समभागांमध्ये तेजी
बीएसई सेन्सेक्समध्ये एनटीपीसीचे समभाग सर्वाधिक 4.84 टक्के वाढताना दिसले. याप्रमाणेच जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, मारुती सुझुकी आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग 3 टक्के वाढत व्यवहार करत होते. इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, विप्रो, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स, अॅक्सिस बँक, एसबीआय, एचसीएल टेक आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभागदेखील तेजी दाखवत बंद झाले.
हे समभाग घसरणीत
दुसरीकडे अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग घसरताना दिसले. यासोबत नेस्ले इंडिया, लार्सन टुब्रो, सन फार्मा यांचे समभागसुद्धा घसरणीसह बंद झाले.
जागतिक बाजारात काय स्थिती
जागतिक बाजारात काहीसे तेजीचे वातावरण होते. अमेरिकेतील बाजार तेजीत होते, ज्यात डोव्ह जोन्स 133 अंकांनी व नॅसडॅक 15 अंकांनी वधारत व्यवहार करत होता. युरोपातील बाजारातही उत्साह होता. आशियाई बाजारात हँगसेंग मात्र 100 अंकांनी घसरणीत होता. याव्यतिरीक्त निक्की 9 अंक, कोस्पी 7 अंक, शांघाई कम्पोझीट 13 अंकांनी वधारत व्यवहार करत होते.









