उत्पादन 165 दशलक्ष किलोग्रॅमवर पोहचले : उत्तर भारतात होते सर्वाधिक उत्पादन
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतात चहाच्या उत्पादनामध्ये दरवर्षी वाढ होताना दिसत आहे. या अंतर्गत पाहता जुलै महिन्यामध्ये चहाचे उत्पादन 165 दशलक्ष किलोग्रॅम इतके घेण्यात आले आहे. मागच्या वर्षी समान अवधीमध्ये 155.29 दशलक्ष किलोग्रॅम चहाचे उत्पादन घेण्यात आले होते. म्हणजेच या खेपेला जुलै महिन्यामध्ये उत्पादनात 6.2 टक्के वाढ झाली आहे.
जगात दुसरा मोठा उत्पादक देश
जगभरातील उत्पादकांच्या देशामध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकावरचा सर्वात मोठा देश राहिला आहे. पहिल्या नंबरवर चहा उत्पादनामध्ये चीन हा देश असून भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. महत्त्वाचे म्हणजे निर्यातीतही भारताचा वाटा नोंद घेण्यासारखा आहे. भारतातून सुमारे 25 देशांना चहाची निर्यात केली जाते.
उत्तर भारतामध्ये 143.05 दशलक्ष किलोग्रॅम इतक्या चहाचे उत्पादन घेण्यात आले आहे. मागच्या वर्षी समान अवधीत 135.77 दशलक्ष किलोग्रॅम इतके उत्पादन घेतले गेले होते. जुलै महिन्यात दक्षिण भारतात पाहता चहाचे उत्पादन 21.95 दशलक्ष किलोग्रॅम इतके नोंदले गेले आहे. मागच्या वर्षी समान अवधीत 19.52 दशलक्ष किलोग्रॅम इतके उत्पादन घेतले गेले होते.
कोणती राज्ये आघाडीवर
उत्तर भारतामध्ये आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी सर्वाधिक चहा उत्पादनाचा वाटा उचलला आहे. भारतामध्ये उत्पादित केलेल्या एकूण चहापैकी 80 टक्के देशांतर्गत लोक चहाचा वापर करतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहता 5 मोठ्या निर्यातक देशांपैकी भारत एक आहे. एकूण निर्यातीपैकी 10 टक्के वाटा भारताचा आहे.









