अध्याय अठ्ठाविसावा
ब्रह्मज्ञान समजावून सांगण्याच्या निमित्ताने उद्धवाला भगवंतांनी गुह्यज्ञानाने शृंगारले. असे अलौकिक दागदागिने त्यांनी उद्धवाच्या अंगावर घातले असल्याने उद्धव अमौलीक झाला. भगवंतांच्या वैकुंठात जाण्याने आता उद्धव अस्वस्थ होणार नव्हता. अशा प्रकारे भगवंतांचा उद्देश सफल झाला. ब्रह्मज्ञान झाल्याने त्याचे मूल्य इतके वाढले की, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ ह्या तिन्ही लोकात राहणारे त्याच्या पायांना वंदन करू लागले. एव्हढेच काय, तो ब्रह्मादिकांनाही पूज्य झाला. निजात्मरूपाच्या अलंकारांनी नखशिखांत नटलेल्या उद्धवाला ब्रह्मस्थिती प्राप्त झाली. तो त्रिजगतात वंद्य झाल्याने त्याचे महात्म्य पुराणातून महाकवी गाऊ लागले. तसं बघितलं तर अमृत गोडीला सगळ्यात श्रेष्ठ पण उद्धवाला भगवंतांनी जे परमामृत पाजले त्यापुढे अमृताची गोडी फिकीच पडते. अमर होण्यासाठी लोक अमृतपान करत असले तरी कल्पांती का होईना ते नष्ट होतात पण उद्धवाची गोष्ट तशी नाही कारण भगवंतांनी त्याला परमामृत पाजल्याने तो अक्षय्य झाला. तो सर्वांगानी शांत होऊन परमानंदी तृप्त झाला. त्यामुळे तो स्वत:ला विसरला आणि स्वानंदाने डोलू लागला. त्या स्वानंदापुढे त्याला संसारातला आनंद शून्यवत वाटू लागला. त्या असार संसाराचा त्याग करून तो देवांपेक्षाही उच्चस्थानी पोहोचला. त्यामुळे त्याला कायम टिकणाऱ्या, सच्चिदानंदाची प्राप्ती झाली. समोर दिसणाऱ्या सर्व वस्तू नाश पावणाऱ्या आहेत परंतु संतांचे विचार कधीही नाश पावत नाहीत. संतांचे विचार माणसाचे चित्त शुद्ध करतात. त्याप्रमाणे जो आचरण करतो तो चिद्रूप होतो. जिथे दु:खाचा लवलेश नसतो तिथे सर्व आनंदीआनंदच असतो.
संत साहित्याचा अभ्यास करून त्याबरहुकूम वाटचाल करणारे धन्य होतात असा ह्या अठ्ठाविसाव्या अध्यायाचा भगवंतांनी केलेला निजबोध समजून घेऊन उद्धव संतुष्ट झाला. आपला वियोग उद्धवाला सहन होणार नाही हे ओळखून माझ्या सगुण रूपावर जाऊ नकोस असे त्यांनी उद्धवाला सांगितले. त्यासाठी निजगुह्य त्याच्यापुढे उघड केले. उद्धवाचे भाग्य किती थोर असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. अर्थात उद्धवाची अनन्य भक्तीच त्याला कारणीभूत होती. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ज्याप्रमाणे उद्धवाला भगवंतांचा विरह सहन होण्यासारखा नव्हता त्याप्रमाणे भगवंतांनाही उद्धवाला सोडून जाणे कठीण झाले होते. सगुण रुपाची गंमतच अशी आहे. येथे भगवंतांनाही भक्ताच्या प्रेमाची आवड असते. एकमेकांवर अलोट प्रेम करता यावे म्हणून देव आणि भक्त एकरूप असले तरी वेगवेगळ्या व्यक्तीमत्वात वावरतात. भगवंतांनी उद्धवाला सांगितलेले गुह्यज्ञान स्वत:च्या पित्याला म्हणजे वासुदेवालाही सांगितले नाही. थोरल्या भावाला म्हणजे बलरामालाही सांगितले नाही. इतकेच काय प्रिय पुत्र प्रद्युम्नालाही ते ह्याबद्दल काही बोलले नाहीत. देवकीमाता, कुन्तिआत्या, यशोदामाता ह्यापैकी कुणालाही हे गुह्यज्ञान त्यांनी दिले नाही. तुम्ही म्हणाल भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला हे ज्ञान दिले आहे कारण तोही उद्धवाप्रमाणे त्यांचा अत्यंत आवडता होता. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण ते युद्धाच्या घाईगडबडीत सांगितले गेले. उद्धवाचे तसे नव्हते. भगवंतांनी उद्धवाला जवळ बसवून घेऊन सावचित्तपणे आपले सगळे ज्ञान त्याला अर्पण केले. पित्याचे धन अनायासे पुत्राला मिळते त्याप्रमाणे श्रीकृष्णाचे गुह्यज्ञान उद्धवाला आणि अर्जुनाला प्राप्त झाले. म्हणून ते दोघेही धन्य होत. उद्धव मनात म्हणाला, हे तर शुद्ध आत्मज्ञान होय परंतु सर्वसामान्यांना हे कसे समजेल अशी चिंता त्याला वाटू लागली. त्यांच्याबद्दलच्या वाटणाऱ्या काळजीतून पुढील अध्यायात हे आत्मज्ञान सर्वसामान्य लोकांना समजेल असे सोपे करून सांगा अशी विनंती उद्धव भगवंतांना करेल. त्याचे समाधान होईल असे निरुपण भगवंत पुढील अध्यायात करतील त्याने सर्वांनाच संतोष होईल.
अध्याय अठ्ठाविसावा समाप्त








