चंद्रावर फिरणाऱ्या ‘प्रज्ञान’चा नवा व्हिडिओ इस्रोकडून जारी
वृत्तसंस्था /बेंगळूर
चांद्रयान-3 च्या चंद्रावर उतरण्याला आता आठवडा उलटून गेला आहे. इस्रोने रोव्हर प्रज्ञानचा एक नवीन व्हिडिओ जारी केला असून त्यामध्ये तो सुरक्षितपणे फिरताना दिसत आहे. प्रज्ञान फिरतानाचा हा व्हिडिओ लँडर विक्रमच्या इमेजर पॅमेऱ्याने घेतला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने रोव्हरच्या पुढील वाटचालीसाठी सुरक्षित मार्गाच्या शोधात रोव्हरला दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. ही रोटेशन प्रक्रिया लँडर इमेजर पॅमेऱ्याने टिपली आहे. इस्रोने त्याचा व्हिडिओही शेअर केला आहे. हा व्हिडिओ ‘एक्स’वर ट्विट करताना “चंदामामाच्या अंगणात एखादे मूल थिरकतंय आणि आई आपुलकीने त्याच्याकडे पाहतेय, असे वाटते.” अशी टॅगलाईन इस्रोकडून देण्यात आली आहे. चांद्रयान-3 च्या यशाने भारत हा चंद्राच्या तुलनेने मोठ्या, अस्पर्शित दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश बनला आहे. आतापर्यंत अतिशय रितसरपणे मोहीम सुरू असून बरीच माहिती इस्रोला प्राप्त झाली आहे. या माहितीचे पृथक्करण आणि सखोल अभ्यास करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या माहितीतून नजिकच्या काळात अनेक पैलूंवर प्रकाश पडणार असून भारतासह जगभरातील विविध शास्त्रज्ञ आणि संशोधकांना त्याचा लाभ होणार आहे.









