वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले बंदर येथे पारंपारिक पद्धतीने नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील नागरिकांबरोबरच येथील पोलिस ठाणे, पत्रकार समिती, विविध संस्था, लोकप्रतिनिधी, व्यापारी यांनी वेंगुर्ले बंदर येथे समुद्राला नारळ अर्पण केला. यावेळी नागरिकांचीही मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत वेंगुर्ला बंदर येथे समुद्राला नारळ अर्पण केला.
दरवर्षी वेंगुर्ला बंदरावर नारळी पौर्णिमा सण बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. यावर्षी सुद्धा नारळी पौर्णिमेला वेंगुर्ला बंदर येथे नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर विविध खाद्यपदार्थांचे स्टॉलही यावेळी लावण्यात आले होते.
या नारळीपौर्णिमे निमित्त तहसिलदार ओंकार ओतारी, वेंगुर्ला प्रांताधिकारी प्रसन्नजीत चव्हाण, पोलिस स्टेशनच्यावतीने पोलीस निरीक्षक अतुल जाधव, नायब तहसिलदारअभिजात हजारे, तालुका पत्रकार समितीच्या वतीने माजी अध्यक्ष प्रदीप सावंत, वेंगुर्ल्यातील व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, हायटेक कॉम्प्युटरचे गणेश अंधारी, आंबा बागायतदार नितीन कुबल, माझा वेंगुर्लाचे सदस्य, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, संघटक सुनील डुबळे, ठाकरे सेनेचे शहरप्रमुख अजित राऊळ यांच्यासाहित विविध संस्था प्रतिनिधी, नागरिक, लोकप्रतिनिधी यांनी नारळाची विधिवत पूजा करून नारळ समुद्राला अर्पण केला. या नारळी पौर्णिमेस वेंगुर्ले बंदर येथे भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन वेंगुर्ले पोलीस स्टेशनतर्फे दुचाकी, तीन चाकी व चार चाकी सर्व वाहानांना 200 मीटर अलिकडे पार्किंगचे सुयोग्य नियोजन केले होते. त्यामुळे नारळी पौर्णिमा निमित्त सागरास नारळ अर्पण करण्यास आलेल्या सर्वांना जाताना व येतांना वहातुक कोंडीची समस्या निर्माण झाली नाही. पोलिसांच्या या नियोजना नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले.वेंगुर्ले तालुक्यात अन्य समुद्र किनारी ही नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.









