हजेरी पुस्तक-पगाराच्या स्लीपची अट रद्द : कामगारांच्या आंदोलनाला यश
बेळगाव : जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना हजेरी पुस्तक आणि पगाराची स्लीप दिली पाहिजे म्हणून अट घालण्यात आली होती. त्यामुळे कामगार अडचणीत आले होते. मात्र हजेरी पुस्तक व पगाराच्या स्लीपची अट रद्द करण्यात आली असून कामगारांच्या आंदोलनाला यश आले आहे. यामुळे कामगारवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कामगारांनी आपले कामगारकार्ड नूतनीकरण करण्यासाठी यापुढे उद्योग प्रमाणपत्र आणि स्वयंघोषणापत्र देऊन नूतनीकरण करावे, असे आवाहन अॅड. एन. आर. लातूर यांनी केले आहे. कामगारांनी एका वर्षामध्ये 90 दिवस काम केले पाहिजे. 90 दिवस काम केल्यानंतरच कामगार कार्ड मिळणार आहे. याचबरोबर त्याचे नूतनीकरण होणार आहे. तेव्हा याचीही दखल घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
बांधकाम कामगारांनी हजेरी पुस्तक तसेच पगाराची स्लीप द्यावी, त्यानंतरच कामगार कार्ड तसेच इतर योजना लागू करू, असे कामगार विभागाने जाहीर केले होते. बांधकाम किंवा इतर कामगार एकाच कंत्राटदाराकडे काम करू शकत नाहीत. याचबरोबर त्यांचे हजेरी पुस्तकदेखील नसते. आठवड्याला पगार दिला जातो. त्यामुळे पगार स्लीपही मिळत नाही. त्यामुळे त्याविरोधात गेल्या पाच महिन्यांपासून कामगारांनी मोर्चे काढून निवेदने दिली होती. जिल्हा बांधकाम संघटनेचे अध्यक्ष अॅड. एन. आर. लातूर, शिवाजी कागणीकर, राहुल पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले होते. कामगारांनीही आंदोलनामध्ये भाग घेतला होता. मजगाव येथील कामगार कार्यालयातील अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देण्यात आली होती. याची दखल घेऊन या जाचक अटी रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे कामगारांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









