मनपरिवर्तनासाठी दिली अध्यात्माची जोड : मन शांत ठेवण्याचा सल्ला
बेळगाव : पोलीस अधिकाऱ्यांनी समाजात सुधारणा घडविण्यासाठी वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करण्याचे ठरविले तर अनेक सकारात्मक बदल घडतात. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून बुधवारी सायंकाळी काळ्या यादीतील गुन्हेगारांच्या मनपरिवर्तनाचा प्रयत्न केला. नव्या प्रयोगांविना माळमारुती पोलीस स्थानकाच्या कारभाराला दोन वर्षांपासून गंज चढला होता. आता ही व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न हाती घेण्यात आले आहेत. बुधवारी काळ्या यादीतील गुन्हेगारांची परेड घेण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी सणासुदीच्या काळात उपद्व्याप केला तर याद राखा, अशी तंबी तर दिलीच, त्याचबरोबर त्याला अध्यात्माची जोड देत त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या भगिनी राखी बांधण्यासाठी पोलीस स्थानकात पोहोचल्या. याच संधीचा सदुपयोग करीत पोलीस निरीक्षक कालीमिर्ची यांनी भगिनींकडून प्रबोधन करवून घेतले. याबरोबरच परेडसाठी उपस्थित असलेल्यांना राखीही बांधण्यात आली. आजचे जीवन संपूर्ण धकाधकीचे आहे. त्यात आपली मनशांती हरवलेली आहे. अशात जर आपण वावगे वागल्यास आणखी त्रासात भर पडते. त्यामुळे शक्य तितके मन शांत ठेवून वागण्याचा सल्ला यावेळी भगिनींनी त्या सर्वांना दिला.









