शालेय नोंदणीसाठी आधारकार्ड बंधनकारक
बेळगाव ; गॅरंटी योजना आणि विद्यार्थ्यांच्या शालेय नोंदणीसाठी आधारकार्ड दुरुस्तीला वेग आला आहे. त्यामुळे कर्नाटक व बेळगाव वन कार्यालयात गर्दी होऊ लागली आहे. विद्यार्थ्यांना शालेय नोंदणीसाठी आधारकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आधारकार्डमधील दुरुस्ती, अपडेट व इतर कामासाठी पालकांसह विद्यार्थ्यांची वर्दळ वाढू लागली आहे. काहींच्या नावात बदल, नाव, पत्ता, मोबाईल नंबरमध्ये दुरुस्ती केली जात आहे. जुनी आधारकार्डे अपडेट नसलेले नागरिक अपडेटसाठी येत आहेत. विशेषत: शालेय नोंदणीसाठी आधारकार्ड गरजेचे बनले आहे. विविध योजनांचा लाभ घेण्याबरोबर इतर सर्वच कामासाठी आधारकार्ड अनिवार्य आहे. मात्र, बहुतांश नागरिकांच्या आधारकार्डामध्ये दुरुस्ती असलेले नागरिक दुरुस्तीसाठी पुढे येत आहेत. काँग्रेस सरकारने पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली आहे. या योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास आधारकार्ड आवश्यक आहे. मात्र, काही जणांच्या आधारकार्डावर मोबाईल नंबर नाहीत, नावात दुरुस्ती आहे. त्यामुळे अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत, असे लाभार्थी आधार दुरुस्तीकडे वळले आहेत. त्यामुळे बेळगाव वन कार्यालयात गर्दी होऊ लागली आहे. रिसालदार गल्ली, अशोकनगर, टीव्ही सेंटर, गोवावेस आदी ठिकाणी असलेल्या बेळगाव वन कार्यालयात नागरिकांची वर्दळ वाढली आहे.









