प्रगती संघटना आंदोलन मंचचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : बेळतंगडी (ता. धर्मस्थळ) येथील उजरेय एसडीएम महाविद्यालयातील विद्यार्थिनी सौजन्या हिच्यावर अत्याचार करून खून केला आहे.. या घटनेतील संशयित आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या घटनेतील खऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रकरण एसआयटीकडे सोपविण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन प्रगती संघटना आंदोलन मंच यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. सौजन्यावर अत्याचार करून निर्घृणपणे तिचा खून करण्यात आला. 2021 मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणी संतोष राव नामक व्यक्तीला अटक केली होती. हे प्रकरण सीओडीकडे तपासासाठी दिले होते. नागरिक व संघटनाच्या सततच्या आंदोलनामुळे सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सीबीआयकडे दिली होती. सीबीआय अधिकाऱ्यांनी न्यायालयामध्ये आपली बाजू मांडली असली तरी आरोपीला शिक्षा देण्यात अधिकारी अपयशी ठरले आहेत. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या प्रकरणातील संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. यामध्ये अधिकाऱ्यांनी प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. यामुळेच साक्षी पुरावे नष्ट झाले आहेत. या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, व सौजन्याला न्याय मिळवून देण्यासाठी विशेष तपास पथकाकडे प्रकरण सोपविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वामध्ये एसआयटीकडून तपास करण्यात यावा. या प्रकरणातील रवि पुजारी, वारीज अचारी या साक्षीदारांनी आत्महत्या करण्यामागे कारण काय? याचा तपास करण्यात यावा, खऱ्या आरोपीचा शोध लावण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. तत्पूर्वी साहित्य भवन येथे कार्यकर्ते जमून चन्नम्मा चौकातून मोर्चाने येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.









