सकाळपासूनच तालुक्याच्या प्रत्येक गावांमध्ये रक्षाबंधनाची लगबग
वार्ताहर /किणये
तालुक्यात बुधवारी राखीपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बहीण भावाच्या पवित्र नात्याचे बंधन असलेल्या राखी पौर्णिमेनिमित्त बहिणींनी आपल्या भावांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. बुधवारी सकाळपासूनच तालुक्याच्या प्रत्येक गावांमध्ये रक्षाबंधनाची लगबग दिसून आली. बऱ्याच ठिकाणी बहिणी आपल्या माहेरला भावंडांना राखी बांधण्यासाठी आल्या होत्या. तर काही ठिकाणी भाऊ रक्षाबंधनानिमित्त बहिणीच्या घरी गेलेले पाहावयास मिळाले. ग्रामीण भागात काही ठिकाणी कुळ घराच्या ठिकाणी आपल्या भावकीतील भावंडांना बहिणी सामूहिक पद्धतीने राख्या बांधताना दिसून आल्या. राखी पौर्णिमेनिमित्त घरातील दारासमोर शेण शिंतोडा करण्यात आला होता. रक्षाबंधनासाठी भावांना बसण्यासाठी आकर्षक अशी व्यवस्था केली होती.
समोर लाकडी पाट ठेवून त्यावर आरती, गोड पदार्थ ठेवण्यात आला होता. राखीचा धागा बांधून आपल्या भावाला उत्तम आरोग्य लाभावे आणि त्याच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये भरभराट व्हावी, अशी मनोकामना यावेळी बहिणींनी व्यक्त केली. त्यानंतर भावांनी आपल्याला जमेल त्या पद्धतीने बहिणीला साडी, भेटवस्तू दिल्या. लहान बालकांमध्ये राखी पौर्णिमेचा उत्साह अधिक प्रमाणात दिसून आला. लहान मुली आपल्या भावंडांना राखी बांधताना त्यांच्या चेहऱ्यावर निरागस प्रेम दिसून आले. काही गावांमध्ये सरकारी व खासगी शाळांमध्येही रक्षाबंधन साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधन याबाबत सविस्तर माहिती पटवून दिली. ग्रामीण भागातील महिला व तरुणींनी शहर परिसरातील दुकानांमधून आकर्षक अशा राख्या खरेदी केल्या होत्या. रक्षाबंधननिमित्त बहिणींनी भावांसाठी गोड पदार्थासह जेवणही बनविले होते.









