काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचे प्रतिपादन : म्हैसूरमध्ये ‘गृहलक्ष्मी’ गॅरंटी योजनेचा शुभारंभ
प्रतिनिधी/ बेंगळूर
विधानसभा निवडणुकीपूर्वी आम्ही पाच गॅरंटी योजनांचे आश्वासन दिले होते. दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याचा विश्वास आम्हाला होता. त्यानुसार आम्ही वाटचाल करत आहे. रक्षाबंधन दिनी महिला, बहिणींना अविस्मरणीय भेट दिली आहे. गॅरंटी योजना देशासाठी आदर्श आहेत, असे प्रतिपादन काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी केले.
म्हैसूरमध्ये ‘गृहलक्ष्मी’ योजनेचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत हेते. गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीमुळे ‘कर्नाटक मॉडेल’ने संपूर्ण देशाच्या राजकारणाची दिशाच बदलणार आहे. सर्व गॅरंटी योजना काँग्रेसच्या नव्हेत; जनतेच्या आहेत. आज एका बटनाच्या क्लिकवर सर्व माता-बहिणींच्या खात्यावर 2 हजार रुपये जमा झाले आहेत. ही केवळ या महिन्यापुरतीच नव्हे; तर आपल्या पक्षाचे सरकार असेपर्यंत पैसे जमा होतील. एक योजना सोडून उर्वरित चारही योजना महिला सक्षमीकरणासाठी आहेत. कितीही मोठे झाड असले तरी त्याची मुळे मजबूत असली पाहिजे. मग वादळ आले तरी ते झाड त्याचा ताकदीने सामना करू शकते. त्याचप्रमाणे महिला या देशाचा पाया आहेत. त्यामुळेच त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.
गॅस सिलिंडर, अन्नधान्य यासह दैनंदिन वस्तुंच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसत आहे. ‘भारत जोडो’ यात्रेवेळी हजारो महिलांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यावेळी बहुतांश लोकांनी महागाईचा मुद्दा मांडून लक्ष वेधून घेतले. त्यामुळे कर्नाटकातील महिला काँग्रेसच्या पाठिशी राहिल्या. कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर येण्यामागे महिलांची भूमिका हेच प्रमुख कारण असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
सिद्धरामय्या-शिवकुमार सरकार देशभर चर्चेत : खर्गे
दिलेल्या आश्वासनांची आम्ही पूर्तता केली आहे. देशातील इतर राज्यांचा दौरा केल्यानंतर तेथील नेते कर्नाटक मॉडेल यशस्वी झाला आहे. अशा योजना आमच्या राज्यातही राबविण्याचे आश्वासन देण्याचा सल्ला देत आहेत, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिले. सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेस सरकार संपूर्ण देशात नावारुपाला आले आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केवळ टीका करू नये. काँग्रेसच्या योजनांची मुक्तकंठाने प्रशंसा करावी, असा मागील 70 वर्षात काँग्रेसने शिक्षण, आरोग्य, लोकांचे दरडोई उत्पन्नवाढ या क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. साक्षरतेचे प्रमाण 18 टक्क्यांवरून 74 टक्क्यांवर आणले आहे. रोजगार हमी योजन काँग्रेसनेच जारी केली. अन्न सुरक्षा कायदा काँग्रेस सरकारच्या काळातच जारी झाला आहे, असे सांगून खर्गे यांनी भाजप नेत्यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले.
जाहीरनाम्याची अंमलबजावणी राजधर्म : सिद्धरामय्या
निवडणूक जाहीरनाम्याची अंमलबजावणी करणे हे कोणत्याही सरकारचा राजधर्म आहे. त्यानुसार आपल्या सरकारने गृहलक्ष्मी योजना जारी केली आहे. सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पाच वर्षात पूर्तता करण्याचा विश्वास आपल्याला आहे. पाच गॅरंटी योजना जनतेसमोर ठेवल्या होत्या. त्यापैकी शक्ती, अन्नभाग्य, गृहज्योती आणि गृहलक्ष्मी योजना जारी झाल्या आहेत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.
गॅरंटी योजनांसाठी वर्षाला 56 हजार कोटी
कर्नाटकात 1.26 कोटी कुटुंबे आहेत. त्या कुटुंबातील मुख्य गृहिणींच्या खात्यावर 2 हजार रुपये जमा केले जात आहेत. 1 कोटी 10 लाख जणांनी गृहलक्ष्मी योजनेसाठी नोंदणी केली आहे. संपूर्ण देशात कोणत्याही राज्यात अडचणीत असणाऱ्या जनतेसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजेच वर्षाला 24 हजार कोटी रुपये जमा केलेले नाहीत. 11 जून रोजी शक्ती योजना जारी झाली. आतापर्यंत या योजनेंतर्गत 48,500 कोटी महिलांनी मोफत बसप्रवास केला आहे. अन्नभाग्य योजना 10 जुलै रोजी जारी झाली. केंद्र सरकारने तांदूळ न दिल्याने अतिरिक्त तांदळाची रक्कम लाभार्थींच्या खात्यावर जमा केली जात आहे. तांदूळ उपलब्ध होईपर्यंत प्रतिव्यक्ती 170 रु. जमा केले जातील. गृहज्योती योजनेंतर्गत 200 युनिटपर्यंत मोफत वीजपुरवठा केला जात आहे. या योजनेसाठी 1.56 कोटी कुटुंबांनी नेंदणी केली आहे. पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, गृहनिर्माण यासारख्या खात्यांच्या विकासकामांसाठी निधीची तरतूद करूनच गॅरंटी योजना जारी केल्या आहेत. पाच गॅरंटी योजनांसाठी वर्षाला 56 हजार कोटी रुपये खर्च योणार आहे, अशी माहिती सिद्धरामय्यांनी दिली.
100 दिवसांच्या कामगिरीच्या पुस्तिकेचे प्रकाशन
विधानसभा निवडणुकीत विजय संपादन केलेल्या काँग्रेस सरकारला 27 ऑगस्ट रोजी शंभर दिवस पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर बुधवारी म्हैसूरमधील कार्यक्रमात सरकारने मागील 100 दिवसांत केलेल्या विकासकामांची माहीती असणारी ‘हस्तपुस्तिका’ प्रकाशित केली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी मुख्यमंत्र्यांच्या प्रसारमाध्यम आणि वार्ता खात्याच्या सहभागातून ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. कन्नड व इंग्रजी या दोन भाषेतून ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. त्यातील संपूर्ण मजकूर वाचण्यासाठी सरकारने क्युआर कोडही जारी केले आहे.
‘युवानिधी’ केव्हा?
राज्य सरकारने चार गॅरंटी योजना जारी केल्या असून पाचवी ‘युवानिधी’ योजना केव्हा जारी होणार याविषयी युवा वर्गामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ही योजना डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात जारी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे. युवानिधी योजनेंतर्गत बेरोजगार डिप्लोमाधारकांना 24 महिन्यांपर्यंत दरमहा 1,500 रुपये आणि बेरोजगार पदवीधरांना 3,000 रु. दिले जाणार आहेत.









