वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चीनने भारताचा भाग आपल्या नकाशात दाखविला आहे. यासंबंधी पंतप्रधान मोदी यांनी मौन बाळगले आहे. त्यांनी काहीतरी बोलले पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. लडाखमध्ये चीनला भारताने आपला एक इंचही भाग बळकावू दिलेला नाही, हे पंतप्रधान मोदी यांचे विधान खोटे आहे. चीनने मोठा भूभाग बळकावला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
चीनने दोन दिवसांपूर्वी आपला नवा नकाशा प्रसिद्ध केला. त्यात त्याने अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन म्हणजेच लडाख आपल्या देशात दाखविला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग हे जी-20 परिषदेसाठी भारतात येत आहे. ही शिखर परिषद 9 सप्टेंबरपासून दिल्लीत होणार आहे. त्याआधी चीनने हा नकाशा प्रसिद्ध करुन भारताची कुरापत काढण्याचा प्रयत्न केला आहे.
भारताकडून निषेध
भारताने चीनचा नकाशा नाकारला असून चीन हेतुपुरस्सर कुरापत काढत असल्यामुळे निषेध व्यक्त केला आहे. काही महिन्यांपूर्वी चीनने अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागांमधील खेड्यांची नावे बदलण्याचाही उद्योग केला होता. तथापि, भारताच्या सेनेने प्रत्येक सीमावर्ती भागात कडेकोट बंदोबस्त ठेवला असून चीनची घुसखोरी होणार नाही, अशी व्यवस्था केल्याचे प्रतिपादन केले आहे.









