अध्याय अठ्ठाविसावा
आत्मज्ञानाने परिपूर्ण झालेल्या ज्ञानी भक्ताचा देह सुखरूप असतानाच त्याला निजसुखाची प्राप्ती होते. तो देहात असला तरी जीवनातल्या सुख दु:खामुळे अजिबात विचलित होत नाही. त्यामुळे तो देहात असला तरी विदेही अवस्थेत असतो. माझ्याशी एकरूप झालेला असल्याने, देह प्रारब्धावर टाकण्याची कला त्याला साध्य झालेली असते. त्यामुळे जीवनात भौतिक, लौकिक सुख असलं काय आणि नसलं काय, त्याच्या आध्यात्मिक सुखात कोणतीच कमतरता पडत नाही. त्यामुळे तो सुखाने नहात असतो. माझ्याशी अनन्य झालेला ज्ञानी भक्त तुला देहात वावरताना दिसेल परंतु ते वावरणे त्याला तशी इच्छा झाली म्हणून नसते कारण तो ज्या हालचाली करत असतो, तो त्या स्वत:हून करत नसतो. मी स्वत: त्याच्या देहात सदैव नांदत असल्याने त्याच्या देहाच्या हालचाली माझ्या इच्छेबरहुकुम चालू असतात. आणखी एक गंमत सांगतो. भक्त आणि मी दोघांनी देहाची आणि हृदयाची अदलाबदल केलेली असते.
भक्त स्वत:चा देह सोडून माझ्या हृदयात रहात असतो तर मी त्याच्या देहात वावरत असतो. वरवर दिसायला मी देव आणि तो भक्त आहे आणि आम्ही दोघे वेगवेगळे आहोत असं लोकांना दिसत असतं! पण प्रत्यक्षात ज्ञानी भक्त आणि मी वेगवेगळे आहोत असं कधीही शक्य होत नाही. तो आणि मी एकच असं आपलं समजुतीकरता म्हणायचं एव्हढंच, कारण भक्त माझ्यात पूर्णपणे मिसळून गेलेला असल्याने त्याचं स्वतंत्र असं अस्तित्व असतंच कुठं? अशा पद्धतीने माझ्यात पूर्णपणे मिसळून गेलेला भक्त नीजसुखात न्हाऊन निघत असतो. ह्यालाच ब्रह्मज्ञानाचा कळस असं म्हणतात.
ह्या अध्यायात ब्रह्मज्ञानाचे समग्र निरुपण आल्याने, ज्याप्रमाणे अलंकारात मुकुटमणी सर्वश्रेष्ठ असतो त्याप्रमाणे हा अठ्ठाविसावा अध्याय एकादश स्कंधाचा मुकुटमणी आहे असं म्हणायला हरकत नाही. उद्धवावर भगवंताचे अतोनात प्रेम होते. त्यामुळे त्याने ब्रह्मज्ञानाबद्दल काहीही न विचारता भगवंतांनी आपणहून त्याला सर्व ज्ञानामृत पाजले. त्यामागे त्यांचा उद्देश असा होता की, जरी त्यांचे सगुण रूप नाहीसे झाले तरी सगुण रुपात भगवंत दिसत नाहीत म्हणून त्याने सैरभैर होऊ नये. सगुण रूपापेक्षा निर्गुण रूप अधिक श्रेष्ठ असून निर्गुण रुपात ते सदैव उद्धवाजवळ हजर असतील अशी त्याची खात्री केवळ ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्याने होईल म्हणून भगवंतांनी हे सर्व निरुपण केले.
आई ज्याप्रमाणे आपला मुलगा सुंदर दिसावा म्हणून त्याला अत्यंत आवडीने दागिने घालते त्याप्रमाणे उत्तमोत्तम ज्ञानाचे अलंकार घडवून भगवंतांनी उद्धवाला अत्यंत आवडीने शृंगारले. आईला आपल्या मुलाला नटवणे, सजवणे मुळातच आवडते. त्यात जर मूल उतारवयात झाले असेल तर काही विचारूच नका, ते अगदी आईच्या हृदयातील ठेवाच झालेले असते. भगवंताच्या दृष्टीने उद्धव अगदी उतारवयात झालेल्या ताह्यासारखाच होता. त्याचे विशेष कोडकौतुक करायच्या उद्देशाने भगवंतांनी त्याला गुह्यज्ञानाने शृंगारले. त्यातही गंमत अशी की, आई मुलाला दागदागिन्यांनी सजवते, नटवते आणि तिच्या मनाचे समाधान झाले की, ती त्याचे दागिने उतरवून ठेवते पण उद्धवाला भगवंतांनी गुह्यज्ञानाने शृंगारले असल्याने ते गुह्यज्ञानाचे दागदागिने भगवंतांना काही उतरवता येईनात. असे अलौकिक दागदागिने त्यांनी उद्धवाच्या अंगावर घातले असल्याने उद्धव अमौलीक झाला.
भगवंतांच्या वैकुंठात जाण्याने आता उद्धव अस्वस्थ होणार नव्हता. अशा प्रकारे भगवंतांचा उद्देश सफल झाला. ब्रह्मज्ञान झाल्याने त्याचे मूल्य इतके वाढले की, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ ह्या तिन्ही लोकात राहणारे त्याच्या पायांना वंदन करू लागले एव्हढेच काय, तो ब्रह्मादिकांनाही पूज्य झाला. निजात्मरूपाच्या अलंकारांनी नखशिखांत नटलेल्या उद्धवाला ब्रह्मस्थिती प्राप्त झाली. तो त्रिजगतात वंद्य झाल्याने त्याचे महात्म्य पुराणातून महाकवी गाऊ लागले.
क्रमश:








