झोपेच्या गोळ्या देऊन आजारी असल्याची बतावणी
बेळगाव : शहरामध्ये सरकारी कार्यालयांच्या आवारात भिक्षा मागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भिक्षा मागण्यासाठी लहान मुलांचा वापर करण्यात येत असल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून सदर भिक्षा मागणाऱ्या महिलेची चौकशी करून चांगलेच खडसावले. कन्नड साहित्य भवन येथे लहान मुलाला कडेवर घेऊन भिक्षा मागण्यासाठी आलेल्या महिलेची एका सूज्ञ महिलेकडून चौकशी करण्यात आली. मुलाला झोपेच्या गोळ्या देऊन मूल आजारी असल्याचे सोंग करत भिक्षा मागितली जात असल्याचे निदर्शनास आले. यावरून सदर सूज्ञ महिलेने त्या महिलेला चांगलेच खडसावले. यानंतर घटनेची माहिती चन्नम्मा चौकात बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन भिक्षा मागणाऱ्या महिलेची विचारपूस केली. सदर महिलेने आपण पाच्छापूर येथील असल्याचे सांगितले. यानंतर आधारकार्ड पाहणी केली असता सदर महिला बागलकोट जिल्ह्यातील नवनगर येथील असल्याचे निदर्शनास आले. यावरून पोलिसांनी भिक्षा मागणाऱ्या महिलेची चांगलीच कानउघाडणी केली. लहान मुलांचा भिक्षा मागण्यासाठी अशाप्रकारे वापर करण्यात येत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देऊन अटक करण्यात येईल, असे खडसावून तिला मूळ गावी जाण्यासाठी भाग पाडले.









