सेंट झेवियर्स संघाला उपविजेतेपद, बिकास मित्ती उत्कृष्ट खेळाडू, उजेर पठाण उत्कृष्ट गोलरक्षक, इसा सराफ सर्वोत्तम उगवता खेळाडू
बेळगाव : आक्रमक व उत्कृष्ट पासिंगच्या जोरावर गतउपविजेत्या सेंट झेवियर्स संघाचा 8-1 असा एकतर्फी पराभव करून लव्हडेल संघाने निमंत्रितांचा आंतरशालेय बीडीएफए चषक पटकावला. बिकास मित्ती उत्कृष्ट खेळाडू, उजेर पठाण उत्कृष्ट गोलरक्षक तर उगवता खेळाडू म्हणून इशा सराफ यांना चषक देऊन गौरविण्यात आले. लव्हडेल स्कूलच्या मैदानावर आयोजित केलेल्या आंतरशालेय बीडीएफए चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे उद्घाटन बीडीएफएचे अध्यक्ष पंढरी परब, राम हदगल, सचिव अमित पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते लव्हडेल व सेंट झेवियर्स संघांच्या खेळाडूंची ओळख करून करण्यात आले. या सामन्यात सुरुवातीपासूनच लव्हडेल संघाने आपल्या छोट्या पासद्वारे आक्रमक चढाया सेंट झेवियर्स संघावर सुरू केल्या. सातव्या मिनिटाला बिकास मित्तीच्या पासवर रोनाल्डो सिंगने पहिला गोल केला. 11 व्या मिनिटाला चेसम खानने दुसरा गोल केला. 21 व्या मिनिटाला रोनाल्डो सिंगच्या पासवर मित्तीने तिसरा गोल केला. तर पहिले सत्र संपण्यास एक मिनिट बाकी असताना रोनाल्डो सिंगने चौथा गोल करून 4-0 ची आघाडी लव्हडेलला मिळवून दिली.
दुसऱ्या सत्रात सेंट झेवियर्सने चढाया सुरू केल्या. 31 व्या मिनिटाला लव्हडेल स्कूलच्या बचावफळीतील खेळाडूच्या हाताला चेंडू लागल्याने पंचांनी झेवियर्सला पेनल्टी बहाल केली. याचा फायदा आदमने घेत गोलात रुपांतर करून 1-4 अशी आघाडी कमी केली. पण त्यानंतर लव्हडेल संघाने आक्रमक चढाया सुरू केल्या. 34 व्या मिनिटाला रोनाल्डो सिंगने पाचवा गोल केला. 39 व्या मिनिटाला गुगेश सिंगने सहावा गोल केला. 42 व्या मिनिटाला डेनी मेतीने सातवा गोल केला. तर 60 व्या मिनिटाला रोनाल्डो सिंगच्या पासवर बिकास मित्तीने आठवा गोल करत 8-1 अशी भक्कम आघाडी मिळवली. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे पंढरी परब, रमेश गुर्जर, राम हदगल, गोपाळ खांडे, लेस्टर डिसोझा, अमित पाटील, एस. एस. नरगुडी, रवि चौगुले व व्हिक्टर परेरा यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू बिकास मित्ती लव्हडेल, उत्कृष्ट गोलरक्षक उजेर पठाण सेंट पॉल्स, उगवता खेळाडू इशा सराफ कॅन्टोन्मेंट, शिस्तबद्ध संघ ज्योती सेंट्रल स्कूल यांना चषक देऊन गौरविण्यात आले.









