वृत्तसंस्था/ मुंबई
भालाफेकपटू नीरज चोप्रा, बुद्धिबळातील प्रतिभावान खेळाडू आर प्रज्ञानंद आणि बॅडमिंटन स्टार एच. एस. प्रणॉय यांच्या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक करताना येत्या 10-15 वर्षांत भारत एक ‘क्रीडानिपुण देश’ म्हणून उदयास येईल, असे मत दिग्गज माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे.
‘मिडविकेट स्टोरीज’चे प्रमुख सल्लागार म्हणून गावस्कर भूमिका बजावणार असल्याचे उघड झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, पूर्वी तुम्हाला फक्त काही खेळांबद्दल बोलले जाताना दिसायचे. मीडिया कव्हरेज फक्त त्यांच्यासाठी असायची. आता सर्व खेळांना प्रसिद्धी मिळायला लागली आहे आणि इतर खेळांमुळे आम्हाला नवीन तारे उदयास येताना पाहायला मिळत आहेत’, असे बुडापेस्टमध्ये नीरज चोप्राने मिळविलेल्य यशाच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले.
‘मला आठवते की, जेव्हा नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते तेव्हा भारत-इंग्लंड मालिका सुरू होती. मी इंग्लंडमधून त्याची कामगिरी पाहत होतो आणि मला ‘मेरे देश की धरती सोना उगले’ हे गाणे गाण्यास सांगितले गेले होते. रविवारी मला हीच अनुभूती आली. असे गावसकर म्हणाले. आम्ही दोन वर्षांपूर्वी नीरजला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकताना पाहिले होते. गेल्या वर्षी त्याने रौप्यपदक जिंकले. परंतु त्याच्यासाठी सुवर्णपदक जिंकणे महत्त्वाचे होते आणि त्याने लांब अंतरावर भाला फेकून ते साध्य केले, असे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे, जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत प्रणॉयने उपांत्य फेरी गाठली आणि त्याने व्हिक्टर एक्सेलसेनचा पराभव केला. जर तुम्ही अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचा क्रीडानिपुण देश म्हणून विचार केला, तर मला वाटते की 10 ते 15 वर्षांच्या कालावधीत भारत देखील एक क्रीडानुपण देश म्हणून ओळखला जाईल, असे मत गावसकर यांनी व्यक्त केले आहे. नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे इतरांना भालाफेकीत उतरण्याची प्रेरणा मिळेल. तुम्ही पाहिले असेल की, या जागतिक स्पर्धेत फक्त नीरजचा समावेश नव्हता, तर अंतिम फेरीत आमचे तीन भालाफेकपटू होते. जेव्हा एखादा खेळाडू चांगली कामगिरी करतो तेव्हा इतरांनाही त्या खेळात सहभागी होण्यास प्रोत्साहन मिळते, असे ते पुढे म्हणाले. गावसकरनी प्रज्ञानंदचेही कौतुक केले. प्रज्ञानंदने उपविजेतेपद पटकावले. तो फक्त 18 वर्षांचा आहे. तो भविष्यात अनेक विजेतेपदे जिंकू शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आशिया कपमध्ये श्रीलंकेला कमी लेखू नका, असा इशारा भारताचा या माजी कर्णधाराने दिला. आशिया चषकासंदर्भात आम्ही भारत-पाकिस्तानच्या शत्रुत्वाबद्दल बोलत आहोत. पण हे विसरू नका की, श्रीलंका देखील तिथे आहे आणि त्यांनी आशिया कप जिंकलेला आहे. या तिन्ही देशांमधील शत्रुत्व नेहमीच खास असते, असे त्यांनी सांगितले. भारतीय क्रिकेटपटूंवरील ‘वर्कलोड’चे व्यवस्थापन करण्याच्या प्रश्नावर गावसकर म्हणाले की, ज्या खेळाडूंना दुखापती आहेत त्यांना विश्रांती देणे महत्वाचे आहे.









