वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नुकत्याच झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियशिप स्पर्धेत पहिल्यांदाच कास्यपदक मिळवणाऱ्या भारताच्या एच एस प्रणॉयने पुरुष एकेरीच्या मानांकन यादीत वरच्या स्थानावर झेप घेतली आहे. मंगळवारी फेडरेशनतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ताज्या मानांकन यादीत प्रणॉय 6 व्या स्थानावर आहे.
केरळच्या 31 वर्षीय एच एस प्रणॉयने पहिल्यांदाच विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत आपला सहभाग दर्शवताना टॉप सिडेड आणि ऑलिम्पिक चॅम्पियन व्हिक्टर अॅक्सलसनला पराभवाचा धक्का दिला होता. या मानांकन यादीत प्रणॉय 72437 मानांकन गुणासह सहाव्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबरपासून प्रणॉयने या मानांकन यादीत पहिल्या 10 बॅडमिंटनपटूमधील आपले स्थान कायम राखले आहे. प्रणॉयने अलीकडच्या कालावधीत मलेशिया मास्टर्स सुपर 500 दर्जाची बॅडमिंटन स्पर्धा जिंकली असून त्याने ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले. भारताचा आणखी एक बॅडमिंटपटू लक्ष्य सेन हा या मानांकन यादीत सध्या 12 व्या तर किदाम्बी श्रीकांत 20 व्या स्थानावर आहे. महिलांच्या विभागात भारताची पी. व्ही सिंधू 14 व्या स्थानावर असून पुरुष दुहेरीच्या मानांकनात सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीने दुसरे स्थान कायम राखले आहे.









