5 आरोपींना अटक : पोलीस अधिकारी निलंबित
वृत्तसंस्था/ प्रयागराज
उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये बहिणीशी छेड काढणाऱ्यांना विरोध केल्यानंतर 10 वीच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी भररस्त्यात या विद्यार्थ्याचा जबर मारहाण करून जीव घेतला आहे. विद्यार्थ्याचे मारेकरी विशिष्ट समुदायाचे असल्याने या घटनेला तेथे सांप्रदायिक स्वरुप प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी निदर्शने केल्यावर मंगळवारी प्रयागराजमध्ये जमाव उग्र झाला आहे. प्रकरण सांप्रदायिक वळण घेत असल्याचे पाहून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.
तर उग्र निदर्शनांनंतर पोलिसांनी सर्व 5 आरोपींना अटक केली आहे. तर पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी निष्काळजीपणा दाखविल्याप्रकरणी तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव सत्यम शर्मा असून तो पुरादलू गावचा रहिवासी होता. सत्यम अन् त्याच्या काकाची मुलगी शाळेतून घरी परतत असताना तुर्कपुरवा गल्लीत विशिष्ट समुदायाच्या लोकांनी छेड काढण्यास सुरुवात केली होती. मुलगी ओरडू लागताच सत्यमने आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला. तर यामुळे चिडलेल्या आरोपींनी सत्यमला जबर मारहाण केली. एका आरोपीचे नाव मोहम्मद युसूफ तर दुसऱ्या आरोपीचे नाव मोहसिन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.









