मॅडम, काय करावे सुचत नाही. माझी मुलगी श्रेया गेले दीड महिना माझ्याजवळ आहे. या मुलीला कसे समजवावे तेच कळत नाही. पाच सहा वर्षे झाली नाही संसाराला तर कंटाळून कसे चालेल?
काय झालं आहे? सासरी काही प्रॉब्लेम आहे का?
तसं काही नाही.
खरं सांगायचं तर वेगवेगळी कौशल्ये असलेली उच्चशिक्षित मुलगी ही! तशी करिअर ओरिएण्टेडच म्हणा ना! आमच्याकडे सारेच उत्तम शिकलेले आणि उच्चपदस्थ! अगदी मोकळं वातावरण. अर्थात ती शिकली म्हणून किचनमधले तिला काही येत नाही अशातलाही भाग नाही. घरात सगळी कामे समजुतीने आणि विभागून करण्याची सवय आहे. त्यामुळे तीही समस्या नाही. तिची सासरची मंडळीही उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत आहेत.
परंतु थोडं असं झालं की लग्नानंतर महिनाभरात श्रेयाच्या सासुबाईंना अर्धांगवायुचा झटका आला. ही तशी अगदी नवीनच.. तिच्याखेरीज घरात कुणी स्त्री नाही. त्यावेळी हिची फार कसरत होऊ लागली. तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. तिच्या सासऱ्यांनी आणि आम्ही सर्वांनी नोकरी सोडायचा निर्णय शक्मयतो घेऊ नको असे सांगितले होते परंतु तिने ऐकले नाही. आम्हीही तिच्या निर्णयात फार हस्तक्षेप केला नाही. सासुबाईंचं सारं छान केलं तिने..सहा महिन्यांनी त्या अगदी व्यवस्थित बऱ्याही झाल्या. नातेवाईकांनी खूप कौतुक केले तिचे. कौतुकाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं तिला. आदर्श सून वगैरे..
मी तिला काही गोष्टी त्याहीवेळी समजावून सांगितल्या. परंतु चांगलं म्हणून घेण्याची एवढी सवय झाली की काही विचारू नका. नंतर पुढे वर्षभरातच तिला मुलगा झाला. आता नोकरी सोडलीच आहे तर आणि थोडं थांबूया असं करत करत पाच सहा वर्षे ही घरातच बसली. अगदी स्पष्ट आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर मुळात केवळ तेवढंच करणं हा तिचा पिंडच नाही आणि तशी कुणी सक्तीही केली नाही तिच्यावर. पण हीच खूप गुंतत गेली. आता हळूहळू चिडचिड सुरू झाली. सर्वांपासून हळूहळू अंतर राखू लागली. सारखी पाहुण्यांची ये-जा आता तिला कंटाळवाणी वाटू लागली. गुणगान गाणारे तेच नातेवाईक हळूहळू थोडं बोलू लागले. पहिल्यासारखे राहिले नाही हो आता…नव्याचे नऊ दिवस हो..असे शेरे मारू लागले. ही आतून खूप दुखावली गेली. कंटाळून माहेरीच निघून आली आहे. हा संसार मला नको वाटतोय म्हणते. नवरा, सासू सासरे, मुलं, नातेवाईक सतत त्यांची ऊठ बस, चहापाणी, नाष्टे, जेवण यातच तिने पार गुरफटून घेतले होते. खूप अटेंटिव्ह राहण्याची सवय लावली की गोंधळ आलाच. तसं पहायला गेलं तर सासरी त्रास नाही. नवराही चांगला आहे. सगळं छान आहे परंतु ही म्हणतेय मी कंटाळले आहे. तिचा तिने वेगळा मार्ग निवडायचा ठरवला आहे.
काल मी तिला विचारलं, ‘अगं तुला घरच्यांची, नवऱ्याची आठवण येत नाही का?मुलाला पहावंसं वाटतं नाही का?’ तर म्हणाली, ‘हल्ली मला कसलाच फरक पडत नाही. कुणी सोबत नसलं तरीही काही वाटत नाही.’ दीड महिना ही इथे राहिली आहे. नुसती भटकते आहे पण तिला ना मुलाची आठवण ना नवऱ्याची…मी विचारलं तिला ‘अगं अचानक काय झालं तुझं? मी काही गोष्टी सांगत होते तेव्हा ऐकलं नाहीस. स्वत:साठी वेळ दे म्हटलं तर तेव्हा म्हणायचीस, काही गरज नाही.
अगं हो. तेव्हा तसंच वाटायचं. पण आता मला माझा वेळ हवाय. माझी, माझी ‘स्पेस’ हवी आहे.’
तिला मी माझ्यापरीनं खूप समजावून सांगितलं की, स्वत:साठी वेळ काढणं म्हणजे काय, ते का करायला हवं वगैरे..पण हिच्या डोक्मयात ते शिरतच नाही. मला अपेक्षित असलेली, मी सांगत असलेली ‘स्पेस’ वेगळी. परंतु तिला हे कळत नाही की मी जे म्हणते आहे ती ही ‘स्पेस’ नाही. तिच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे. अंतर वाढत आहे. जाणीवा बोथट होत जाणे म्हणजे स्पेस नव्हे ना हो?’ मला हे काही ठीक वाटत नाही. प्लीज बोला तिच्याजवळ. या मुलांना एकदम काय होतं कळत नाही.
माझा भाचा तोही असाच.. काही वर्षे संसार केला. बायको म्हणेल ते आणि तसं असाच वागत राहिला. लग्न झाल्यावर ‘हाच का तो?’ असा प्रŽ पडावा इतका गुरफटला. आता म्हणतो मला माझी स्पेस हवीय. झालं..सगळं विस्कटायच्या मार्गावर आहे. बायकोला वाटतंय याचं प्रेम कमी झालं किंवा याचे दुसरीकडे अफेअर सुरू असेल. पण तसं काहीच नाही.
काय करावं या मुलांचे काही समजत नाही.
श्रेयाची आई खूप गोंधळली होती.
श्रेया सोबत खूप वेळ चर्चा झाली. चांगुलपणाचे ओझे, तिची होणारी घुसमट, तिच्या मनातील स्पेस संदर्भातील गोंधळ, नेमके काय करणे गरजेचे आहे यावर चर्चा झाली आणि आलेली मानसिक मरगळ दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी, काही तंत्र आत्मसात करण्यासाठी श्रेया तयारही झाली.
अलीकडच्या काळात अनेकदा काही संकल्पनांबाबत तऊण जोडप्यांची गल्लत पहायला मिळते. गंमत पहा हं, विवाहाच्या अगदी सुऊवातीला किंवा काहीवेळा वर्षानुवर्षे अनेक स्त्रिया नवऱ्याच्या दिनक्रमाभोवती आपला दिनक्रम कसरत करत, धडपडीने विणताना दिसतात. त्याला हवं तसं, तो म्हणेल तसं आणि तिथे जायचं, त्याच्या आवडीचाच स्वयंपाक, त्याला आवडतील असेच कपडे, अगदी त्याच्या पावलावर पाऊल टाकत चालत राहतात. हे चित्र काही पुऊषांच्या बाबतीतही पहायला मिळते. सुऊवातीला ती म्हणेल तसं, प्रत्येक हो ला हो म्हणणे मनात रंगवलेले संसाराचे काल्पनिक वा फिल्मी चित्र पूर्ण करण्यासाठी कसरत सुरू असते. काहीवेळा आपण ‘मेड फॉर इच अदर’ कसे आहोत हे दाखविण्याची अनेक जोडप्यांची चाललेली धडपडही पहायला मिळते.
वैवाहिक नात्यामध्ये एकमेकांसाठी बदलणे, एकमेकांच्या आवडी निवडींना प्राधान्य देणे, एकमेकांचा आदर करणे या गोष्टी आवश्यक आहेतच त्याबाबत दुमत नाही. परंतु ते किती आणि कसे? दुसऱ्याच्या मताचा आदर राखत एकमेकांना ‘नाही’ म्हणण्याचे स्वातंत्र्य व त्या ‘नाही’चा खुल्या दिलाने दोघेही स्वीकार करत आहेत का हेही महत्त्वाचे. नात्याचे संगोपन करताना त्याला मायेचे, प्रेमाचे, आपुलकीचे, तडजोडीचे सिंचन लागतेच परंतु ते करत असताना विविध गोष्टींच्या स्वीकाराचा परिघ तुम्ही कसा आणि किती कौशल्याने आखत आहात हेही खूप महत्त्वाचे ठरते. नाहीतर सुऊवातीला काही वर्षे सारे छान असते. नंतर त्याने किंवा तिने थोडा वेळ स्वत:साठी ठेवायला सुऊवात केली, काही बाबतीत ‘नाही’ म्हटले जाऊ लागले की ‘फारच बदललीस तू/बदललास तू’ अशी सुऊवात आणि त्यावरून विकोपाला जाणारी असंख्य भांडणे पहायला मिळतात व नात्याचा प्रवास ‘अंतर’ वाढण्याच्या दिशेने होऊ लागतो. अगदी ‘संसारात रमली हो ती’ असं म्हणणारे किंवा ‘आदर्श सून आहे अगदी’ असे कौतुक करणाऱ्या नातेवाईकांच्या, लोकांच्या टीकेची ‘ती’ धनी होऊ लागते. अर्थात हे पती पत्नी दोघांच्याही बाबतीत घडू शकते. म्हणून स्त्री काय किंवा पुऊष काय दोघांनीही हे लक्षात घ्यायला हवे की पत्नी, आई, मुलगी, सून, बहीण किंवा पती, बाबा, मुलगा, जावई, भाऊ या साऱ्या आपल्या भूमिका आहेत. त्या आवश्य नीट पार पाडाव्यात परंतु ते करत असताना स्वत:साठी थोडा ‘अवकाश’ काढायला हवा. त्या ‘अवकाशा’मध्ये आपले आत्मभान, ‘स्व’ विषयक जाणीव, विकास कसा होईल हे पहायला हवे. त्या वेळात आपली बलस्थाने, उणिवा कोणत्या याकडेही लक्ष द्यायला हवे. ज्या उणिवा असतील त्यावर कशा पद्धतीने काम करता येईल याचा विचार व तदनुसार कृती, यावरही विचार व्हायला हवा. मला स्पेस हवी म्हणताना स्पेससंदर्भात आपली गल्लत तर होत नाही ना हेही तपासायला हवे. स्पेस म्हणजे अंतर नव्हे. स्वत:साठी काढलेला ‘अवकाश’ वा असा वेळ की जिथे आपण स्वत:मध्ये डोकावून पहायला शिकू, आपल्या धारणा, मूल्ये, जाणीवा याबाबत सजग होऊ.. अर्थात हे सारे एका लेखात मांडणे शक्मय नाही याविषयी अधिक जाणून घेऊया पुढच्या लेखात..
-अॅड. सुमेधा संजीव देसाई








