विज्ञानाने प्राण्यांचे क्लोनिंग तर शक्य केले आहे, परंतु मानवी क्लोन कधी तयार होणार हे कुणीच सांगू शकत नाही. पण टोकियोतील एका स्टार्टअपने माणसाचा डिजिटल क्लोन तयार करण्यास यश मिळविले आहे. हा क्लोन हुबेहुब कंपनीच्या मालकाप्रमाणे दिसतो, त्याच्याप्रमाणे बोलतो. व्यक्तीचे वर्तन आणि पसंतीतील बदलानुसार अपडेट देखील होतो. हे इनोव्हेशन जपानी कंपनी ऑल्ट इंकने केले आहे. कंपनीचे सीईओ कजुताका योनेकुरा यांनी सर्वांचे डिजिटल क्लोन असतील, अशाप्रकारच्या जगाचे स्वप्न पाहिले आहे.

हा क्लोन आमच्या दैनंदिन कामांची जबाबदारी उचलू शकतो. म्हणजेच झूम मीटिंगमध्ये सामील होण्याची क्षमता त्याच्यात असल्याचा दावा योनेकुरा यांनी केला आहे. तसेच त्यांनी कॉम्प्युटर स्क्रीनवर कृत्रिम आवाजयुक्त स्वत:चा क्लोन दाखविला आहे. डिजिटल क्लोन तुम्हाला अशा सर्व नियमित कामांपासून मुक्त करतो, जी तुम्हाला उद्या, परवा किंवा त्यापुढील दिवशी करायची आहेत. हे तंत्रज्ञान सिरी, चॅटजीपीटी किंवा गुगल एआयपेक्षा अधिक व्यक्तिगत आहे. सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे हे तुमचे आहे, याची निर्मिती करणाऱ्या तंत्रज्ञान कंपनीचा हा क्लोन नाही. यामुळे तुमच्या खासगीत्वाला कुठल्याही प्रकारचा धोका उदभवणार नसल्याचे 46 वर्षीय योनेकुरा यांनी सांगितले आहे.
ऑल्टने तयार केलेल्या क्लोनसाठी सुमारे 1.16 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. याचमुळे व्यापक स्तरावर याच्या निर्मितीस अजून वेळ लागणार आहे. ज्या व्यक्तीचा डिजिटल क्लोन तयार करायचा आहे, त्याच्याविषयी माहिती सोशल मीडिया साइट आणि सार्वजनिक स्वरुपात उपलब्ध रिकॉर्डमधून प्राप्त करत सॉफ्टवेअरमध्ये संग्रहित केली जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले आहे.

डिजिटल क्लोनचे तंत्रज्ञान
दक्षिण कॅलिफोर्निया आणि टोकियो विद्यापीठाच्या सहकार्याने ऑल्टला सुमारे 330 कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. जपानी बँकांच्या व्हेंचर कॅपिटल फंडमधूनही मदत मिळाली असल्याची माहिती योनेकुरा यांनी दिली. जपानी अॅनिमेशनप्रमाणेच डिजिटल क्लोन तंत्रज्ञानाच्या जगात वेगळे स्थान निर्माण करणार असल्याचे उद्गार तंत्रज्ञान तज्ञ यू तमुरा यांनी काढले आहेत.
सृजनात्मकतेसाठी होणार मदत
डिजिटल क्लोन अशाप्रकारे डिझाइन करण्यात आला आहे की तो मूळ व्यक्तीचे अधिकाधिक काम सांभाळू शकेल. हा डिजिटल क्लोन बैठकीत सामील होण्यासह उमेदवारांच्या भरतीसाठी मुलाखती घेऊ शकतो. जर क्लोन डॉक्टरचा असेल तर तो रुग्णांचे प्रारंभिक स्क्रीनिंग करण्यास समर्थ असणार आहे. यामुळे मूळ व्यक्तींचा मूल्यवान वेळ अधिक सृजनात्मक गोष्टींवर खर्च होऊ शकणार आहे. तसेच थकवा आणणाऱ्या संभाषणावरील त्यांचा वेळ कमी खर्च होणार आहे.









