प्रत्येक पोलीस स्थानकामधून सोशल मीडियावर नजर, आक्षेपार्ह-खोट्या पोस्टची दखल
बेळगाव : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आक्षेपार्ह व समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या पोस्टवर पोलीस दलाने करडी नजर ठेवली आहे. यासाठी प्रत्येक पोलीस स्थानकात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी ठेवली आहे. यापूर्वी केवळ पोलीस आयुक्त कार्यालय व जिल्हा पोलीस मुख्यालयात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या संदेशांवर नजर ठेवण्यासाठी यंत्रणा कार्यरत होती. आता सोशल मीडियाचा वाढता पसारा व चुकीच्या संदेशांमुळे निर्माण होत असलेला तेढ लक्षात घेऊन प्रत्येक पोलीस स्थानकात स्वतंत्र व्यवस्था कार्यरत करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांच्या सूचनेवरून शहरातील प्रत्येक पोलीस स्थानकात यासाठी तीन पोलीस कामाला लावण्यात आले आहेत. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर आदी सेशल मीडियाच्या वेगवेगळ्या व्यासपीठांवर फिरणाऱ्या संदेशांवर आता प्रत्येक पोलीस स्थानकात नजर ठेवली जात आहे. राज्य पोलीस महासंचालक अलोक मोहन यांच्या सूचनेवरून सर्वत्र ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. बेळगाव शहरात गेल्या महिन्याभरापासून ही विशेष यंत्रणा कार्यरत झाली आहे. खासकरून धार्मिक, जातीय, सामाजिक तेढ निर्माण होईल, असे संदेश पसरविणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. या यंत्रणेवर एसीपी व पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची देखरेख असणार आहे. बेळगाव पोलीस आयुक्त कार्यक्षेत्राप्रमाणेच जिल्हा पोलीस दलाच्यावतीनेही प्रत्येक पोलीस स्थानकात ही यंत्रणा कार्यरत झाली आहे.
पोलीस दलाची डोकेदुखी वाढली
कोणत्याही सणाच्या तोंडावर सामाजिक तेढ निर्माण होईल, असे संदेश पसरविले जातात. त्यामुळे अफवांमध्ये भर पडते. सामाजिक सलोख्याला तडा जातो. परिस्थिती हाताळण्यात पोलिसांची दमछाक होते. केवळ बेळगावातच नव्हे तर संपूर्ण राज्यात सोशल मीडियामुळे पोलीस दलाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळेच राज्य पोलीस महासंचालकांच्या सूचनेवरून सोशल मीडियावर स्वतंत्र यंत्रणेमार्फत प्रत्येक पोलीस स्थानकात लक्ष ठेवण्यात येत असून चुकीचे व प्रक्षोभक संदेश पसरविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.
बारकाईने नजर : पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा
यासंबंधी पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांच्याशी संपर्क साधला असता यापूर्वी केवळ पोलीस आयुक्त कार्यालयात ही यंत्रणा कार्यरत होती. राज्य पातळीवर यंत्रणेच्या संपर्कात राहून सोशल मीडियावरील संदेशांवर लक्ष ठेवण्यात येत होते. आता प्रत्येक पोलीस स्थानकात ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे, असे त्यांनी सांगितले.









