बेळगुंदी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : जमिनीचा योग्य वेळेत उपयोग करून न घेतल्याने गोची
बेळगाव : बेळगुंदी येथील गावठाण जमीन एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटला देण्यात आली होती. मात्र, सदर जमिनीचा योग्य वेळेत उपयोग करून घेण्यात आला नसल्याने ती जमीन ग्रामस्थांनाच परत देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन बेळगुंदी ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बेळगुंदी येथील सर्व्हे नंबर 303ए, 305, 306 मधील 28 एकर 36 गुंठे जमीन एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटला ऊस संशोधन केंद्र व महाविद्यालय उभारण्यासाठी देण्यात आली होती. 19 वर्षांपूर्वी सदर जमीन या संस्थेला दिली होती. दरम्यान, जमीन मंजूर करताना दोन वर्षांमध्ये नियोजित उद्देशासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा उपयोग करून घेण्यात यावा, अशी अट घालण्यात आली होती. मात्र, या संस्थेकडून त्या अटीचे पालन करण्यात आलेले नाही. 19 वर्षांचा कालावधी उलटला तरी जमीन तशीच पडून आहे. त्यामुळे ही जमीन बेळगुंदी ग्रामस्थांसाठी प्राथमिक शाळा, महाविद्यालय, विद्यार्थ्यांसाठी मैदान यासाठी उपयोगी होते. त्यामुळे सदर जमीन ग्रामस्थांनाच देण्यात यावी. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटने नियमाचे उल्लंघन केल्याने त्यांना मंजूर करण्यात आलेली जमीन परत ग्रामस्थांना देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन शुगर इन्स्टिट्यूटला जमीन मंजूर केल्याचा आदेश रद्द करावा, असे ग्रामस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. यावेळी सुरेश किणयेकर, कृष्णा गावडा, जयवंत खासगावडे, परशुराम शहापूरकर, मारुती शिंदे आदी ग्रामस्थ, ग्रामपंचाय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.









