वृत्तसंस्था / कोलकाता
केंद्रातील भाजप-रालोआ सरकारकडून आगामी लोकसभा निवडणूक डिसेंबरमध्येची घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी त्या दृष्टीने तयारी करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. लोकसभा निवडणूक प्रचारासाठी भाजपने आतापासूनच बहुतेक सर्व हेलिकॉप्टर्सचे बुकिंग केले आहे. त्यावरुन हा संकेत मिळतो. विरोधी पक्षांनी ही शक्यता गृहित धरली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या युवाशाखेच्या सभेत बोलत होत्या. भाजप तिसऱ्या वेळेला निवडून आला तर देशात हुकुमशाही येईल, असा इशारा त्यांनी दिला. काही लोक बेकायदेशीर कृत्ये करण्यात मग्न आहेत. त्यांनी हा मार्ग सोडला पाहिजे, असे आवाहन त्यांनी राज्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या फटाक्यांच्या कारखान्यांमधील आगीच्या घटनांच्या संदर्भात केले. या आगीत 8 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.
विरोधी पक्षांच्या नेत्यांना प्रचारासाठी हेलिकॉप्टर्स मिळू नयेत असा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे या पक्षाने आधीच बरीचशी हेलिकॉप्टर्स आडवून ठेवली आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांनीही अन्य योजना करण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला पुन्हा सत्ता मिळता कामा नये, असे त्यांनी बजावले.









