मुले मोठी झाल्यावर त्यांचे शिक्षण पूर्ण होते, त्यानंतर त्यांना नोकरी मिळते किंवा ते स्वत:चा उद्योगधंदा सुरु करतात. त्यांचे स्वत:चे उत्पन्न सुरु झाल्यावर आई-वडील त्यांच्यामागे लग्नाचा तगादा लावतात. लग्न झाल्यानंतर एकमेकांचे स्वभाव मिळते-जुळते नसल्यास आपली वर्तणूक कशी असावी, आपल्याला कुठे आणि केव्हा तडजोड करावी लागणार आहे याचे ट्रेनिंग कुठेही दिले जात नाही. त्या धक्क्यामधून सावरण्यापूर्वीच त्या जोडप्यास अपत्यप्राप्ती होते. आता या बाळाला कसे वाढवावे, पालक कसे व्हावे, त्या बालकाला केव्हा काय शिकवावे, केव्हा काय शिकवू नये याचे ट्रेनिंग कुठेही उपलब्ध नाही. असल्यास फारच कमी आई-वडील पालकत्वाबद्दल सजगतेने पूर्वतयारी करतात. पालक होणे हे जबाबदारीचे काम आहे, अभ्यासाचा विषय आहे परंतु अनेक आई-वडील ऐकीव माहितीवर मुलांना वाढवतात. त्यांच्या माहितीचा स्त्राsत त्यांचे आई-वडील म्हणजेच बालकाचे आजी-आजोबा असतात. आजी आजोबांनी पालक होताना त्याबद्दल काही विचार केला होता की ते चुका करता करता शिकले? त्यांनी केलेल्या पालकत्वाच्या चुका कोणत्या, या प्रश्नाला आजी-आजोबांकडून उत्तर मिळत नाही. “आमच्या काळी असलं फॅड नव्हतं. आम्ही असंच शिकलो, तुमचं काही वाईट झालंय का?” अशी उत्तरे मिळाल्यावर पालकत्वाचे शिक्षण थांबते.
सुजाण पालक होण्यासाठी काय करावे? त्याचे कोणी क्लासेस काढले तरी त्या पालकत्वाचा असा काही ठोस फॉर्म्युला नाही, ज्यामध्ये 21 प्रश्नांना अपेक्षित उत्तरे देता येतील. आपल्या आई-वडिलांनी आपल्याला जसे वाढवले तसे आत्ताच्या अल्फा जनरेशन (सहावीपर्यंत शिकणारी बालके) आणि ‘जेन झी’ (सहावीपासून पदवी शिक्षण घेणारे युवक) जनरेशनला वाढवता येणार नाही. आताच्या पिढीचे प्रश्न वेगळे आहेत. त्यामुळे पालक होण्यापूर्वी त्याबद्दल वाचन-चिंतन करण्याची गरज आहे, याची जाण असणे ही सजग पालक होण्याची पहिली पायरी. पालक असताना प्रत्येक टप्प्यावर त्याबद्दल सजग राहणे, काल केलेल्या चुका आज सुधारणे आणि नियमांच्या चौकटीतल्या स्वातंत्र्याविषयी माहिती घेणे, त्याबद्दल नवनवे प्रयोग करत राहणे या पुढच्या पायऱ्या आहेत.
सजग पालकांच्या जबाबदाऱ्या- आपल्या मुलांकरीता वेळ देणे आणि मुला-मुलीना विविध विषयांचे xिंज्देल्rा देणे. शालेय शिक्षण विषयांपलीकडे शिकवण्यासारखे बरेच काही असते. शाळेच्या अभ्यासक्रमाचा भाग नसलेले अनेक विषय पालक शिकवू शकतात, शालेय शिक्षणाबाहेरील जग पालकच दाखवू शकतात. त्यासाठी वेळ देणे हा एकमेव उपाय आहे. वेळ देण्याला पर्याय म्हणून शालेय विषयांच्या ट्युशनला आणि अनेक प्रकारच्या क्लासेसला नाव नोंदवण्याची फॅशन रूढ असली तरी क्लास लावल्यामुळे मुलांना त्या विषयाची गोडी लागू शकत नाही. आपल्या मुलांना कोणत्यातरी क्लासमध्ये गुंतवणे म्हणजे पालकत्व नव्हे. अनेक पालक मुला-मुलीना सातवी-आठवीपासूनच दूरदृष्टीने (?) आय.आय.टी. ची तयार करण्याच्या क्लासेसला नाव घालतात. त्या वयात क्लास-शाळा-पुन्हा क्लास अशा चक्रात अडकवल्यावर त्यांचे बालपण हिरावून घेतले जाते. परंतु पालकांना त्यांच्या ऑफिसच्या वेळेत मुलांनी घरी राहणे मान्य नसते. त्यामुळे वेदिक गणितापासून कराटे, असे बरेच क्लासेसचे पीक आले आहे. त्या चक्रात अडकल्यावर शिक्षण कमी होत राहते. म्हणूनच शालेय विषयांच्या बाहेरच्या जगाची ओळख करून देण्यासाठी (िंxज्देल्rा) संगीत-नाटक अशा प्रकारच्या प्रत्यक्ष घडणाऱ्या कलांची अनुभूती देणे, शेती पर्यटन, निसर्गात भटकंती करताना प्राणी-पक्षी-झाडे ओळखून त्यांची वैशिष्ट्यो जाणून घेणे, भारतातील विविध राज्यांना भेट देऊन त्याच्या वैविध्याची ओळख करून देणे, असे अनेक विषय आहेत.
सुजाण पालक होणे ही जबाबदारी आई-वडील दोघांची आहे. दोघेही अर्थार्जन करणारे असोत वा नसोत, पालकत्वाच्या जबाबदारीमधून कोणीही मुक्त होऊ शकत नाही. आई-वडील यांनी दोघांनी नियमितपणे एकमेकात चर्चा करून आपल्या मुला-मुलीचे संवर्धन कसे करायचे यावर विचारविनिमय करावा, त्यावर पुस्तके वाचावीत, चर्चा करून त्याचा आराखडा तयार करावा. ज्या विषयांवर समाजामध्ये बोलले जात नाही, त्या विषयांवर खुली चर्चा केल्यास कुटुंबामध्ये मोकळेपणा येतो. त्यामुळेच शाळेमध्ये महाविद्यालयात काही कटू-प्रसंग घडला तर मुले-मुली प्रथम पालकांना सांगतील. आजचा दिवस कसा गेला याबद्दल आई-वडिलांनी गप्पा मारल्या तरच मुले शाळेमध्ये काय झाले हे मनमोकळेपणाने सांगतील. आई-वडिलांमध्ये विसंवाद असल्यास त्याचा फायदा घेण्यास मुले आपोआप शिकतात.
चॉकलेट कोणाकडे मागायचे हे एक-दोन वर्षाच्या मुला-मुलीलाही समजते. कोणाकडून कशाला नकार येणार आहे, याची त्या बालकाला कल्पना असते. मोबाईल बघण्याबद्दल काही नियम केल्यास, खाण्या-पिण्याचे काही नियम केल्यास घरातल्या कोणीच त्यात सूट देऊ नये. अन्यथा त्यातील तफावतीचा मुले फायदा घेतात. आई-वडील ज्याला मनाई करतात त्याची मागणी आजी-आजोबांकडे कशी करायची, हे लहानपणापासून काहीही न शिकवता मुलांना समजते.
भूक लागल्यावर रडणे कोणत्याही वयाच्या बालकाला माहित असते. आपण रडल्यावर सगळे घर सैरभैर होते हे बालक पहिल्या सहा महिन्यात अनुभवते. हळूहळू रडणे या अस्त्राचा ते वापर करू लागते आणि त्या बालकाचे रडणे खोटे आहे हे समजेपर्यंत बालक मोठे झालेले असते. मोठे होता होता इमोशनल ब्लॅकमेलींगची कला त्या बालकाला चांगलीच उमगलेली असते. अर्धा तास अभ्यास केला तर मला अर्धा तास मोबाईल देणार का? ही भाजी खाईन पण मला कार्टून लावून दे, असे बालसुलभ नसलेले हट्ट कसे करावे याचे ज्ञान त्यांना आपसूक मिळते. जे पालक पैसे मिळवण्यात गुंतल्यामुळे वेळ देऊ शकत नाहीत ते पालक असे हट्ट पुरवतात. “आम्ही आमच्या मुलांना काही कमी पडू देणार नाही” ही मानसिकता पालक आपल्याच मुला-मुलींसाठी वेळ देऊ शकत नसल्यामुळे तयार झाली आहे.
आत्ताची मोठी समस्या अतिकाळजी (ओव्हर पॅरंटींग) आहे. शहरातील मुले-मुली फारच सुरक्षित वातावरणात वाढवली जात आहेत. या मुलांचे शाळेचे दप्तर त्यांचे आई-वडील उचलतात. मुले नाराज होणार नाहीत अशाच भाज्या त्यांना खाऊ घालतात. त्या मुलांनी नाराज होऊ नये म्हणून नियमितपणे एक कुरकुरेचा पुडा त्यांच्या हातात दिला जातो. मुलांच्या प्रत्येक मागणीला होकार देणे म्हणजे पालकत्वाच्या जबाबदारीतून मुक्त होणे असे त्यांना वाटते. मुलांची काळजी करणे, त्यांना सतत खुश ठेवणे म्हणजे त्यांच्यावरचे प्रेम व्यक्त करणे नव्हे. नकार देण्यामध्ये पालकांना विलक्षण ‘रिस्क’ वाटते. मुलांना चुका करण्याची संधी न देण्याकडे पालकांचा कल असतो. त्यामुळे असे पालक मुलांचे प्रोजेक्ट स्वत: करतात.
आपल्या पाल्यांचे बोट वेळेत न सोडल्यामुळे मुले खुल्या आकाशात झेप घेऊ शकत नाहीत. अनेक शहरात शेजारच्या गल्लीतल्या ‘इंटरनशनल स्कूल’ मध्ये पाचवीच्या पुढे शिकणाऱ्या मुला-मुलींना चालत शाळेत एकटे जाता येत नाही.
चिमणा-चिमणी त्यांच्या पिल्लांना घरट्यामधून बाहेर उडी मारण्यासाठी चिवचिवाट करून सांगतात. ते पिल्लांचे बोट/पंख धरत नाहीत. पिल्लू ज्या क्षणाला आपल्या पंखांनी आकाशात भरारी मारायला शिकते, त्या क्षणी पिल्लाला खाऊ घालण्याचे काम त्या पिल्लाचे पालक बंद करतात. तद्वत शालेय मुला-मुलींच्या पालकांनी वेगवेगळ्या विषयासंबंधी मुलांचे बोट सोडण्याचा दरवर्षीचे नियोजन करणे आवश्यक आहे. सातवी-आठवीनंतर शाळा-कॉलेजचा कोणताही फॉर्म मुलांनी स्वत: भरला आणि त्यांनी केलेल्या चुका शाळा-कॉलेजमध्ये त्यांना समजल्या तरंच त्यामध्ये सुधारणा होऊ शकते. घरातील फार कमी कामे मुला-मुलीना पूर्ण जबाबदारीने दिली जातात. चुका केल्याशिवाय शिक्षण कसे होणार? म्हणूनच जगदीश खेबुडकर म्हणतात…..
तुजभवती वैभव माया,
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया,
हा कुठवर वेड्या घेसी आसरा
सोडी सोन्याचा पिंजरा.








