शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टिका केली. भाजपने आपला खासदार सनी देओलचा बंगला लिलावात निघताना तातडीने हस्तक्षेप करून त्याचा बंगला वाचवला पण त्यांनी नितिन देसाई अडचणीत असताना त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असल्याचे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “सनी देओलवर बँकेचे सुमारे ६० कोटी रुपये कर्ज होते. त्यामुळेच बँकेने त्यांच्या बंगल्याचा लिलाव जाहीर केला. मात्र २४ तासांत दिल्लीतील नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर बँकेकडून हा निर्णय बदलण्यात येऊन लिलाव रद्द करण्यात आला. भाजपने आपला खासदार आणि त्यांचा बंगला वाचवला,” असा आऱोपही त्यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, “ चंद्रकांत देसाई आत्महत्या करण्यापुर्वी दोन दिवस आधी दिल्लीला गेले होते. तिथे त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती आणि कर्जाची रक्कम परत करण्यासाठी मुदत वाढवून स्टुडिओ वाचवण्याची विनंती केली होती, परंतु कोणीही त्यांना मदत केली नाही. दिल्लीहून परतल्यानंतर लगेच त्यांनी आत्महत्या केली.” असा दावाही त्यांनी केला.
भाजपवर टिकास्त्र सोडताना ते म्हणाले,“चंद्रकांत देसाईंना वेगळी वागणूक का मिळाली? त्यांना सनी देओलसारखा न्याय का मिळाला नाही? असा सवालही संजय राऊत यांनी केला. चंद्रकांत देसाई 2 ऑगस्ट रोजी कर्जत येथील त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी एडलवाइज एआरसीकडून कर्ज घेतल्याने ते वेळेत परत करू न शकल्य़ाने त्यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले आहे.








