प्रतिनिधी,कोल्हापूर
कळंबा कारागृहातून आता थेट सातासमुद्रापार असणाऱ्या अमेरीका,ब्राझील,नायझेरीया येथे संपर्क साधणे एका क्लिकवर शक्य झाले आहे.कारागृह प्रशासनाच्या वतीने कळंबा कारागृहात ‘ई प्रिझन’ अॅप्लीकेशन सुरु करण्यात आले आहे.या आधारे कारागृहात नवीन व्हिडीओ कॉन्फरन्सींगचे अॅप विकसीत करण्यात आले आहे.याचा लाभ पहिल्या टप्प्यात परदेशी बंदीजनांना देण्यात येत आहे.लवकरच हा लाभ कारागृहातील सर्वच कैद्यांना मिळणार आहे.
कळत नकळत हातून घडलेल्या गुह्यांची शिक्षा भोगताना गुन्हेगार म्हणून नावावर पडलेला शिक्का पुसणे सोपे नसते.शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर समाजाशी पुन्हा एकरूप होण्यात बंदिजनांना अडचणी येतात. जे बंदिजन मानसिकदृष्ट्या सक्षम असतात तेच पुन्हा नव्याने जगणे सुरू करतात, मात्र अनेक जण नकारात्मक मानसकतेमुळे पुन्हा गुन्हेगारी कृत्यांकडे वळतात किंवा व्यसनांच्या आहारी जातात. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर बंदीजनांना त्यांच्या पायावर उभे राहता यावे यासाठी कळंबा कारागृहामध्ये सध्या फाँड्री, सुतारकाम, लोहारकाम, शेती,बगीचा, लाडू प्रसाद केंद्र, बेकरी, टेक्सटाईल असे विविध उद्योग सुऊ आहेत.याचसोबत कारागृहातील कैद्यांची मानसिकता सकारात्मक रहावी यासाठी कारागृहात कैद्यांना नातेवाईकांना भेटण्याची मुभा दिली जाते. मात्र काही गंभीर गुह्यातील कैद्यांना या भेटीची मुभा नाकारण्यात येते.कारागृहात काही परराज्यातील तर काही परदेशातील कैदीही असतात. कळंबा कारागृहात सध्या परराज्यातील 67 तर परदेशातील 9 कैदी आहेत.खून,मारामारी, मोकासह ड्रग्जच्या खटल्यांमध्ये हे सर्व आरोपी शिक्षा भोगत आहेत.त्यांच्या नातेवाईकांना काय आहे अॅप्लीकेशन कारागृह प्रशासनाच्या वतीने आठ दिवसांपूर्वी ई प्रिझन हे अॅप्लीकेशन सुरु करण्यात आले आहे. या अॅप्लीकेशनद्वारे कळंबा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्याचा नातेवाईक ऑनलाईन भेटीसाठी अॅप्लीकेशन करु शकतात.या अॅप्लीकेशन मधून भेटण्याची विनंती मान्य झाल्यानंतर संबंधीत नातेवाईकाला कारागृहातील कैद्यासोबत 20 मिनीटे व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संपर्क साधता येणार आहे.
असे करा भेटीचे अॅप्लीकेशन
नातेवाईकांनी ई प्रिझन अॅप्लीकेशन मध्ये लॉगिन करुन त्यामध्ये असणारी सर्व माहिती भरणे आवश्यक आहे. यामध्ये भेटणाऱ्याचे नांव, पत्ता, आई, वडीलांचे पूर्ण नांव, पत्ता, वय, लिंग, भेटणाऱ्या कैद्याशी नाते,मोबाईल नंबर, ई मेल आयडी,ओळखपत्र, त्याचा नंबर अशी माहिती भरावी लागते.यानंतर ज्या कैद्यास भेटायाचे आहे त्याची माहिती भरणे बंधनकारक आहे. राज्य,कारागृहाचे नांव, कधी भेटणार याची तारीख,किती लोक भेटणार, त्यांची संपूर्ण नावे, कैद्याचे नांव, कैद्याच्या वडीलांचे नांव, कैद्याचे वय, लिंग अशी माहिती भरणे गरजेचे आहे. यानंतर हा फॉर्म संबंधीत कारागृहाच्या प्रशासनाकडे जातो. कारागृह प्रशासनाकडून अॅप्लीकेशन करणाऱ्या व्यक्तीच्या ओळखपत्रांची खातरजमा केली जाते. यानंतर कारागृह प्रशासन भेटीबाबतचा निर्णय घेते. 20 मिनीटांसाठी ही परवानगी दिली जाते. 20 मिनीटे कारागृहातून कैदी आपल्या नातेवाईकांशी बोलू शकतो. भेटीचा अर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदाराच्या मेलवर एक लिंक पाठविली जाते. या लिंकवर जावून आपण ऑनलाईन पद्धतीने कैद्याची भेट घेवू शकतो.
11 ते 6 या वेळेतच भेट
कारागृहाने अॅप्लीकेशन मंजूर केल्यानंतर अर्जदाराला भेटीची वेळ दिली जाते. ही वेळ सकाळी 11 ते 6 या वेळेतच देण्यात येते. कैद्याला कारागृहात असणाऱ्या व्हीडीओ कॉन्फरन्स रुममधून नातेवाईकांशी संपर्क साधता येतो.भेटणाऱ्या सर्व व्यक्तींची खातरजमा कारागृह प्रशासनाच्या वतीने करण्यात येते.
कळंबा कारागृहात सध्या 9 परदेशी कैदी आहेत. तर 67 परराज्यातील कैदी आहेत. हे सर्व गंभीर गुह्यातील कैदी आहेत.त्यांना भेटण्यासाठी नातेवाईक दुरुन येण्याचे टाळत असतात.याचाच विचार करुन कारागृह प्रशासनाच्या वतीने ‘ई प्रिझन’ अॅप्लीकेशन सुरु करण्यात आले आहे.याद्वारे कारागृहातील बंद आता अमेरीका, ब्राझील, नायझेरीया येथील नातेवाईकांशी संपर्क साधू शकतात.
कारागृह अधिक्षक, पांडुरंग भुसारे









