आमदार दिगंबर कामत, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांच्यात दिलजमाई
मडगाव : मडगाव पालिकेत नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिल्यानंतर सुरू झालेल्या नाट्यावर लगेच पडदा पडला असून याला नगराध्यक्ष शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुजोरा दिला. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्यासमवेत आपली रविवारी बैठक झाली. या बैठकीत त्यांनी गैरसमज दूर करून नगराध्यक्षपदी राहण्यास सांगितले. त्यामुळे आपण नगराध्यक्षपद भूषविणे चालू ठेवणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आमदार कामत यांची नगराध्यक्ष शिरोडकर यांनी भेट घेतली असता नगरसेवक महेश आमोणकर हेही त्यांच्यासोबत होते. ही भेट घडवून आणण्यासाठी आमोणकर यांनी पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. आमदारकामत यांनी मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर आणि पालिकेच्या अन्य अधिकाऱ्यांना घेऊन मडगावातील नानुटेल हॉटेलात बैठक घेताना आमंत्रित न केल्याने व विश्चासात न घेतल्याने संतापलेल्या नगराध्यक्ष शिरोडकर यांनी थेट नगराध्यक्षपद सोडून देण्याचा इशारा शनिवारी दिला होती. नगराध्यक्षांच्या या आकस्मिक पवित्र्याने मडगावच्या स्थानिक राजकारणात खळखळ उडाली होती.
मडगावचे आमदार आणि मडगावचे नगराध्यक्ष यांच्यातील संबंध ताणले गेले असल्याचे यातून स्पष्ट झाले होते. शनिवार असल्याने मी माझा राजीनामा पालिका प्रशासन संचालकांकडे देऊ शकलेलो नाही. सोमवारी मी माझा राजीनामा सादर करण्याची शक्यता आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले होते. मला अंधारात ठेवून सध्या निर्णय घेण्यात येतात. त्यामुळे मी दुखावलो गेलो आहे. मला आता या पदामध्ये स्वारस्य राहिलेले नाही, असेही शिरोडकर म्हणाले होते. यासंदर्भात आमदार कामत यांनी शनिवारी प्रतिक्रिया व्यक्त करताना, नगराध्यक्ष शिरोडकर यांनी अशी भूमिका घेण्यामागचे कारण आपल्यालाही माहीत नाही, मात्र जर काही मतभेद असतील, तर ते दूर करू, असे स्पष्ट केले होते.
नोकरभरतीप्रश्नी निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
नगराध्यक्षांनी राजीनाम्याचा इशारा देण्यामागे पालिकेने 8 कनिष्ठ कारकून, 34 कामगार आणि 1 गवंडी अशी पदे भरण्यासाठी जी नोटीस काढली होती ती मागे घेण्याच्या प्रकाराचीही धग असल्याचे सांगण्यात येत आहे. आठ कनिष्ठ कारकुनांपैकी दोन पदे सत्ताधारी नगरसेवकांना मिळणार होती. या पार्श्वभूमीवर प्रभाग 11 चे गोवा फॉरवर्ड सोडून भाजपात आलेले नगरसेवक राजू नाईक यांनी आपण नोटीस काढल्यानंतर पदे भरणे थांबविण्याच्या प्रकारामुळे दुखावलो असल्याचे उघडपणे सांगितले होते. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नगरसेवकांना आमदार कामत यांनी पदे देण्याचे आश्वासन पूर्ण केले जाईल असे सांगितले आहे. नोकरभरती प्रक्रिया रद्द करण्यास सांगणारे नगरविकास खात्याचे पत्र मागे घेण्यासंदर्भात आमदार कामत यांचा भरवसा नगरविकासमंत्री विश्वजित राणे यांच्यावर आहे. सदर पत्रावर आज सोमवारी मुख्याधिकारी शंखवाळकर निर्णय घेण्याची शक्यता असून या प्रश्नी काय निर्णय होतो याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.









