पर्वरी : भारत सरकारने आयुष मंत्रालयातर्फे शालेय मुलांसाठी होमिओपॅथी तपासणी करण्याचा उपक्रम राबवित आहे. नुकतेच रायबंदर येथील जुन्या मेडिकल इस्पितळात केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते होमिओपॅथी तपासणी यूनिट सुरू करण्यात आले आहे. गोव्यातही केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू करणार आला असून त्यासाठी गोव्यातील वीस शाळांची निवड करण्यात आली आहेत त्यातील सरकारी प्राथमिक शाळा-पर्वरी,विद्या प्रबोधिनी प्राथमिक शाळा- पर्वरी आणि डॉ. हेडगेवार हायस्कूल ,कुजिरा बांबोळी या शाळांमध्ये हा उपक्रम ‘पायलट प्रकल्प’ म्हणून हाती घेण्यात आला आहे. अशी माहिती नोडल ऑफिसर गोविंद पर्वतकर आणि गोव्यातील होमिओपॅथी यूनिट प्रमुख डॉ. आशीष शिवडीकर यांनी दिली. यावेळी त्यांच्या समवेत डॉ. अनिशा नाईक,डॉ. श्री रवली ,आणि डॉ. प्राजक्ता समुद्र उपस्थित होते.
होमिओपॅथी औषध प्रणाली ही ‘काट्याने काटा’ काढणे अशी असून एखादा रोग समूळ नष्ट करण्याची ताकद या औषधात असते. त्यासाठी भारत सरकारने आयुष मंत्रालयातर्फे भारतातील सर्व शालेय मुलांसाठी होमिओपॅथी तपासणी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. जेणे करून लहान वयातच एखादा आनुवंशिक रोग मुलामध्ये आला असेल तर त्याला वेळीच आळा घालणे शक्य होईल. हा उपक्रम सदया इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या मुला मुली करिता असून तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी केली जाईल. तसेच दर महिन्याला त्याच योग्य तपशील शिक्षक व पालक यांच्या सहायाने ठेवला जाईल. सदया किमान दोन डॉक्टर एक शाळेसाठी देण्याचे निश्चित केले आहे. जस जसा पालक आणि शिक्षक यांच्या प्रतिसाद मिळेल तस तशी या उपक्रमाची व्याप्ती वाढविली जाईल. असे डॉ. आशीष शिवडीकर यांनी सांगितले. नोडल ऑफिसर गोविंद पर्वतकर यांनी या पथकाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.









