ओटीपीशिवाय रकमेची उचल करण्याची नवी शक्कल : पोलीस अधिकारीही चक्रावले
बेळगाव : सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या कक्षा डोकेदुखीच्या ठरू लागल्या आहेत. त्यामुळे डिजिटल पाकिटाची सुरक्षा धोक्यात आली आहे. सायबर गुन्हेगारांच्या नवनवीन गुन्हेगारीच्या प्रकारांमुळे बँक खातेधारकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. आयुष्यभर कमावलेली पुंजी भलत्याच्या घशात जाऊ नये, यासाठी आणखी खबरदारी घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. तरुण भारतने गेल्या काही आठवड्यात सायबर गुन्हेगार, त्यांची गुन्हेगारीची कार्यपद्धती, गुन्हेगारीसाठी सोशल मीडियाचा वापर कसा होतो? फेसबुक, टेलिग्रामच्या माध्यमातूनही सावजांची आर्थिक फसवणूक कशी होते? याविषयी वृत्त प्रसिद्ध केले आहे. आता आणखी एक नवा प्रकार सायबर गुन्हेगारीच्या क्षेत्रात सुरू झाला आहे. या प्रकाराने बँक खातेधारकांची झोप उडविली आहे. एखाद्या सायबर गुन्हेगार कोणाच्या तरी खात्यातून पैसे काढताना ओटीपी (वन टाईम पासवर्ड) गरजेचा असतो. कोणत्या तरी माध्यमातून सावजाशी संपर्क साधून त्यांच्याकडून ओटीपी मागून घेतला जातो. ओटीपी मिळाल्यानंतरच सावजाच्या बँक खात्यात त्यांना शिरता येते. काही क्षणात बँक खात्यातील पैसे गायब होतात. असे अनेक प्रकार बेळगाव व जिल्ह्यात घडले आहेत. सायबर क्राईम विभागाकडे अशा प्रकारांच्या नोंदीही आहेत. चार दिवसांपूर्वी बेळगाव येथे घडलेल्या एका घटनेने तपास यंत्रणेसमोरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. बँक ग्राहकाला कसल्याही प्रकारचा संपर्क न साधता किंवा ओटीपीची देवाणघेवाण न होता बँक खात्यातून रक्कम गायब करण्यात आली आहे. हा नवा प्रकार ‘एईपीएस’ (आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टीम) च्या माध्यमातून घडला आहे. ही व्यवस्था अतिसुरक्षित मानली जाते. या व्यवस्थेलाही सायबर गुन्हेगारांनी सुरुंग लावला आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
संपूर्ण व्यवस्थेसमोरच प्रश्नचिन्ह
एईपीएसच्या माध्यमातून आधारक्रमांक, फिंगरप्रिंट, आयव्ही स्कॅन यांची प्रक्रिया पूर्ण करून मायक्रो एटीएममधून व्यवहार करायला मदत होते. या व्यवस्थेतून पैसे काढण्यासाठी बँक ग्राहकाला स्वत: त्या सेंटरवर जावे लागते. मात्र, आता ग्राहक न जाताच त्यांच्या खात्यातून पैसे उचलल्याचे प्रकार घडू लागले आहेत. चार दिवसांपूर्वी घडलेल्या एका प्रकाराने संपूर्ण व्यवस्थेसमोरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. एका प्रतिष्ठित डॉक्टरांच्या मोबाईलवर एक मेसेज आला, ‘तुमच्या बँक खात्यातील रक्कम एईपीएसच्या माध्यमातून काढण्यात आली आहे.’ हा मेसेज वाचून त्यांना धक्का बसला. आपण तर एटीएम किंवा एईपीएस यंत्रणेकडे पैसे काढण्यासाठी गेलो नाही. तर आपल्या खात्यातून रक्कम कशी गायब होते? असा प्रश्न पडला. लगेच त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या खात्यावरील व्यवहार रोखला. या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतरच नेमका हा व्यवहार कसा झाला? याची माहिती मिळणार आहे. सध्या तरी सारेच संभ्रमात आहेत.
सायबर गुन्हेगार अद्यापही खात्यावर लक्ष ठेवून
सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या बँक खात्यात होते तितके पैसे खाली केले होते. ते इतक्यावरच थांबले नाहीत. दोन दिवसांनंतर त्या खात्यात रक्कम किती आहे? हे तपासण्याचा प्रयत्न झाला. त्याचाही मेसेज संबंधितांना आला. यावरून सायबर गुन्हेगार अद्यापही या खात्यावरील व्यवहारवर लक्ष ठेवून आहेत, हे लक्षात आले. संबंधित बँक खातेधारक एटीएमवर न जाता, एईपीएसच्या माध्यमातून त्यांचे फिंगरप्रिंट व्हेरिफिकेशन करण्याआधी व्यवहार करणे कसे शक्य झाले? या प्रश्नाने तपास अधिकारीही चक्रावले आहेत.
सायबर गुन्हेगारांच्या तक्रारींची वाढ
सध्या या प्रकरणी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. बेळगाव पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रासाठी एक व संपूर्ण जिल्ह्यासाठी एक अशी दोन सीईएन पोलीस स्थानके कार्यरत आहेत. या दोन्ही पोलीस स्थानकात सायबर गुन्हेगारांच्या लुटमारीच्या तक्रारींची संख्या दिवसागणिक वाढतीच आहे. यापूर्वी बारीकसारीक प्रकरणांसाठीही सायबर क्राईम विभागाकडेच धाव घ्यावी लागत होती. राज्य पोलीस महासंचालक अलोक मोहन यांनी घेतलेल्या एका निर्णयाने परिस्थितीत थोडीशी सुधारणा झाली आहे. पाच लाखांपर्यंतची गुन्हेगारी प्रकरणे नागरी पोलिसांनाही हाताळण्यासाठी व दाखल करून घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पाच लाखांच्यावर असलेली प्रकरणे सीईएन विभागाकडे पाठविली जात आहेत. त्यामुळे सीईएनवरील भार थोडासा कमी झाला असला तरी या दोन्ही पोलीस स्थानकांकडे असणारी प्रकरणे लक्षात घेता सायबर गुन्हेगारांच्या कक्षा बऱ्याच रुंदावल्या असून रोज नवनवीन पद्धतींचा अवलंब करीत सर्वसामान्य नागरिकांच्या बँक खात्याला खिंडार पाडले जात आहे.









