आंबेवाडी पशुचिकित्सालयामार्फत गाय-बैल, शेळ्या-मेंढ्या अन् कुत्र्यांना लसीकरण
बेळगाव : आंबेवाडी येथील पशुचिकित्सालयातर्फे पशुधन रोग नियंत्रण अभियान सक्रियपणे राबविले जात आहे. शेळ्या-मेंढ्या, गाय-बैल आणि कुत्र्यांना प्रतिबंधक लस दिली जात आहे. चिकित्सालयाच्या अखत्यारितील गावांमध्ये ही मोहीम अधिक तीव्रपणे राबविली जात आहे. रविवारी कंग्राळी खुर्द येथील 54 तर सुळगा (हिं.) येथील 64 कुत्र्यांना अँटीरेबीज प्रतिबंधक लस दिली आहे. गावोगावी असलेल्या पशुसखी यांच्या माध्यमातून ही मोहीम अधिक सोयीस्कर होऊ लागली आहे. साहाय्यक निर्देशक डॉ. आनंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पशुधन रोग नियंत्रण अभियान राबविले जात आहे. अलीकडे लम्पीचा धोका पुन्हा वाढू लागला आहे. खबरदारी म्हणून आंबेवाडी पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत अखत्यारितील गावांमध्ये प्रतिबंधक लस टोचली जात आहे. त्याबरोबर शेळ्या-मेंढ्यांना देखील पीपीआर लस दिली जात आहे. शिवाय अलीकडे कुत्र्यांनी हल्ला करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे धोका टाळण्यासाठी सर्व कुत्र्यांना अँटीरेबीज प्रतिबंधक लस दिली जात आहे.
घरोघरी लम्पी प्रतिबंधक लसीकरण
विशेषत: दवाखान्यामार्फत गाय, बैल, कुत्रा आणि शेळ्या-मेंढ्यांना रोगापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. लम्पी प्रतिबंधक लस घरोघरी जाऊन दिली जात आहे. तर रेबीज प्रतिबंधक लसीकरण गावच्या मुख्य ठिकाणी राबविले जात आहे. एकूणच अखत्यारितील सर्व जनावरे रोगमुक्त ठेवण्यासाठी चिकित्सालयाचे प्रयत्न सुरू आहेत.
सर्व जनावरे रोगमुक्त व्हावीत यासाठी प्रयत्न
आंबेवाडी पशुचिकित्सालय अखत्यारित येणाऱ्या सर्व गावांमध्ये लम्पी, रेबीज आणि पीपीआर प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. गाय, बैल, कुत्रा आणि शेळ्या-मेंढ्यांना लस दिली जात आहे. सर्व जनावरे रोगापासून मुक्त रहावीत यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
– डॉ. प्रताप हन्नूरकर (आंबेवाडी पशुचिकित्सालय)









