वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे झालेल्या आयबीएसएच्या विश्व क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सुवर्णपदक मिळवले. भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने सुवर्णपदक मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला संघाचे खास अभिनंदन केले आहे.
बर्मिंगहॅममध्ये झ्घलेल्या आयबीएसएच्या विश्व क्रीडा स्पर्धेत अंधांच्या क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. भारतीय महिल अंध क्रिकेट संघाने मिळवलेले हे यश संपुर्ण देशाला अभिमानास्पद असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव करत सुवर्णपदक सहज मिळवले. या सामन्यात पावसाचा अडथळी आल्याने पंचांनी डकवर्थ लेविस नियमाच्या आधारे भारतीय संघाला 4 षटकात विजयासाठी 42 धावांचे उद्दिष्ट दिले होते. भारताने 3.3 षटकात 1 बाद 43 धावा जमवत आपला विजय नोंदवला. तत्पुर्वी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 114 धावा जमवल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने पॉवरप्ले दरम्यान 29 धावा जमवल्या. भारताने 8 व्या आणि नवव्या षटकात ऑस्ट्रेलियाचे दोन गडी बाद केल्याने त्यांची स्थिती 3 बाद 39 अशी होती. त्यानंतर लेविस आणि वेबॅक यांनी 54 धावांची भागीदारी केल्याने ऑस्ट्रेलियाला 114 धावापर्यंत मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 20 षटकात 8 बाद 114, भारत 3.3 षटकात 1 बाद 43 (भारताला विजयासाठी 4 षटकात 42 धावांचे उद्दिष्ट).









