शरद पवार हे महाराष्ट्रातील राजकारणातील भिष्म पितामह असून ते आपल्या बंडखोर आमदारांशी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या विचारांनी वागत आहेत असे मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. तसेच शरद पवार हे भाजप बरोबर गनिमी काव्याने लढत असल्याचेही त्यांनी सांगितले.
काही दिवसापुर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे बंडखोर नेते अजित पवार हे आपलेच नेते असल्याचे म्हटल्याने एकच खळबळ उडाली. तसेच ऱाष्ट्रवादी पक्षामध्ये अजूनही फुट पडली नसल्याचेही त्यांनी म्हटल्यानंतर आलेल्या प्रतिक्रियानंतर महाविकास आघाडीमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले कि, “महाराष्ट्रातील राजकारणात शरद पवार हे भिष्म- पितामह असून त्यांचे देशाच्या राजकारणातील महत्व मोठे आहे. ते आपल्या बंडखोर आमदारांबरोबर आणि तसेच भाजप सरकार विरोधात गनिमी काव्याने लढत आहेत. ज्या पद्धतीने छ. शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांशी वागायचे त्याच प्रमाणे शरद पवार आपल्या बंडखोर आमदारांशी छत्रपती शिवरायांप्रमाणेच वागत आहेत.” असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडलीच नसल्याचे सांगून अजित पवार हे पक्षाचे अजूनही नेते आहेत असे सांगितले होते. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर खासदार संजय राऊत यांचे हे वक्तव्य समोर आले आहे.








