क्रीडा प्रतिनिधी/ मडगांव
चेन्नईन एफसीचा पिछाडीनंतर 4-1 गोलांनी पराभव करून एफसी गोवाने ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश मिळविला. काल ही लढत गुवाहाटीतील इंदिरा गांधी अॅथलेटीक स्टेडियमवर खेळविण्यात आली. एफसी गोवासाठी कार्ल मॅकह्युज, कार्लोस मार्टिंनेझ, नोहा सदाउई व व्हिक्टर रॉड्रिग्ज यांनी तर पराभूत चेन्नईन एफसीचा एकमेव गोल बिकाश युमनानने केला.
सामन्याच्या पाचव्याच मिनिटाला चेन्नईन एफसीने एफसी गोव्यावर गोल लादला. आयुषने डाव्या बगलेतून केलेल्या कॉर्नरवर बिकाश यूमनानने एक अप्रतिम हेडरवर एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज सिंगला भेदले व गोल केला. चेन्नईनचा आघाडीपटू जॉर्डन मरे याने एफसी गोवाच्या बचावफळीवर सतत दबाव ठेवण्यात येश मिळविले.
त्यानंतरच्या खेळावर मात्र एफसी गोवाचा दबदबा पाहायला मिळाला. प्रथम दहाव्या मिनिटाला नोहा सदाउईने दिलेल्या क्रॉसवर कार्लोस मार्टिंनेझचा गोल करण्याचा यत्न गोल खांब्याला आदळून परत आला. त्यानंतर तीनच मिनिटांनी कप्तान ब्रँडन फर्नांडिस व कार्लोस मार्टिंनेझने संयुक्तपणे रचलेल्या चालीवर उदांता सिंगची गोल करण्याची संधी थोडक्यात हुकली. 25व्या मिनिटाला ब्रँडनच्या फ्रिकीकवर संदेश झिंगनचा हेडरने गोल करण्याचा यत्न फसल्यानंतर एफसी गोवाने 30व्या मिनिटाला बरोबरीचा गोल केला.
उदांता सिंगने दिलेल्या क्रॉसवर नोहा सदाउईने हेडरद्वारे कार्ल मॅकह्युजला चेंडू दिला. यावर मॅकह्युजने चेन्नईन एफसीचा गोलरक्षक समीक मित्राला भेदले व बरोबरी साधली. या गोलनंतर एफसी गोवाची आक्रमणांची मालिका चालूच राहिली. 32व्या मिनिटाला उदांता सिंगच्या पासवर नोहाचा हेडर गोलमध्ये जात असताना किंचित हुकला.
37व्या मिनिटाला एफसी गोवाने दुसरा गोल करून पिछाडीवरून आघाडी घेतली. यावेळी मिळालेल्या संधीचा अचुक उपयोग करताना कार्लोस मार्टिंनेझने प्रतिस्पर्धी गोलरक्षक समीक मित्राला भेदले व चेंडू जाळीत मारला, दुसऱ्या सत्रातही एफसी गोवाचे निर्भेळ वर्चस्व सामन्यावर आढळून आले.
दुसऱ्या सत्रात एफसी गोवाने चार बदल केले. सावियर गामा, रेनियर फर्नांडिस, उदांता सिंग व कार्लोस मार्टिंनेझ यांच्या स्थानावर जय गुप्ता, रॉवलीन बॉर्जिस, व्हिक्टर रॉड्रिग्ज व बोरीस सिंग यांना घेण्यात आले. इंज्युरी वेळेत एफसी गोवाने आणखी दोन गोल केले व एफसी गोवाचा विजय अधिक सोपा केला. इंज्युरी वेळेतील पहिल्याच मिनिटाला नोहा सदाउईने एफसी गोवाचा तिसरा तर तिसऱ्या मिनिटाला बदली खेळाडू व्हिक्टर रॉड्रिग्जने जितेश्वर सिंगला चकवित चौथा गोल केला. आता उपान्त्य फेरीत एफसी गोवाचा सामना मुंबई सिटी एफसी आणि मोहन बागान अॅथलेटीक क्लब यांच्यात होईल.









