वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘बीसीसीआय’चे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे निमंत्रण स्वीकारले असून त्याअंतर्गत 4 ते 7 सप्टेंबरदरम्यान लाहेरला भेट देतील. यादरम्यान ते आशिया चषक स्पर्धेचे काही सामने पाहतील. ‘पीसीबी’ने ‘बीसीसीआय’च्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिले होते आणि मिळालेल्या माहितीनुसार, त्यापैकी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी त्यांना दिलेले आमंत्रण स्वीकारण्यास भारतीय मंडळाची मान्यता मिळाली आहे.
मुलतान येथे 30 ऑगस्ट रोजी या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा नेपाळशी सामना होणार आहे. त्यानंतर चार सामने श्रीलंकेत होणार आहेत. त्यात सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेला पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सामना समाविष्ट आहे. बिन्नी, शुक्ला आणि सचिव जय शाह हे 2 सप्टेंबरला पल्लिकेले (कँडी) येथे होणार असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी श्रीलंकेला जाणार आहेत. ते 3 सप्टेंबरला भारतात परततील आणि त्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष वाघा सीमामार्गे लाहोरला जातील, असे एका सूत्राने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर बोलताना सांगितले.
बिन्नी आणि शुक्ला या दोघांनाही आपापल्या पत्नीसह लाहोरमधील गव्हर्नर हाऊस येथे 4 सप्टेंबर रोजी पीसीबीने आयोजित केलेल्या अधिकृत डिनरसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयचे दोन्ही पदाधिकारी 5 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका आणि दुसऱ्या दिवशीचा पाकिस्तानचा सामना पाहतील. 2004 साली सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील संघाने मालिकेत ऐतिहासिक विजय मिळविला होता तेव्हा ‘बीसीसीआय’चे वरिष्ठ पदाधिकारी आणि काँग्रेसचे राज्यसभा खासदार शुक्ला हे देखील भारतीय क्रिकेट संघाचा एक भाग होते.









