वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा नेमबाज रूद्रांक्ष पाटीलची पुरूषांच्या 10 मि. एअर रायफल नेमबाजी प्रकारातील कामगिरी सध्या बाकूमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफच्या विश्व नेमबाजी चॅम्पियनशीप स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यापेक्षा अधिक दर्जेदार झाली आहे. मात्र बाकूच्या या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या 53 सदस्यांच्या भारतीय नेमबाज संघातून रूद्रांक्ष पाटीलला वगळण्यात आले होते. 2024 साली होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेचे तिकीट रूद्रांक्ष पाटीलने यापूर्वीच आरक्षित केले आहे.
येथील कर्नीसिंग नेमबाजी संकुलात घेण्यात आलेल्या पात्र फेरीच्या नेमबाजी स्पर्धेत रूद्रांक्ष पाटीलने अंतिम फेरीत 251.9 गुण नोंदविले. दरम्यान बाकूमध्ये सुरू असलेल्या विश्व नेमबाजी चॅम्पियनशीप स्पर्धेत पुरूषांच्या 10 मि. एअर रायफल नेमबाजीत सुवर्णपदक मिळविणारा स्वीडनचा नेमबाज व्हिक्टर लींडग्रेनने 251.3 गुण नोंदविले. रूद्रांक्ष पाटीलने लींडग्रेनपेक्षा 0.6 गुणांची अधिक नोंद केली. बाकूतील स्पर्धेसाठी भारतीय संघात रूद्रांक्ष पाटीलचा समावेश केला असता तर भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळविता आले असते. बाकूमधील झालेल्या स्पर्धेत भारताने 6 सुवर्ण आणि 8 कास्य अशी एकूण 14 पदकांची कमाई करत पदकतक्त्यात दुसरे स्थान पटकाविले. तर चीनने या स्पर्धेत आघाडीचे स्थान भक्कम केले.









