वृत्तसंस्था / चंदीगढ
हरियाणातील दंगलग्रस्त जिल्हा नूहमध्ये दोन दिवसांसाठी इंटरनेट बंदी लागू करण्यात आली आहे. 28 ऑगस्टपासून लागू होणार आहे. याच दिवशी विश्व हिंदू परिषदेने येथे ब्रिज मंडल जलाभिषेक यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे दक्षता म्हणून हा निर्णय घेण्यात आला. या संघटनेने या यात्रेची घोषणा 13 ऑगस्टला केली होती. मात्र, हरियाणाच्या प्रशासनाने या यात्रेला अनुमती नाकारली होती. आता ही अनुमती देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
काही दिवसांपूर्वी नूहमध्ये दंगल झाली होती. हिंदू आणि मुस्लीम समाजांमध्ये झालेल्या या दंगलीचे पडसाद राज्यभर उमटले होते. आता विश्व हिंदू परिषदेच्या जलाभिषेक यात्रेत काही अनुचित प्रकार घडू नयेत, म्हणून यात्रेला अनुमती देण्यात आली नव्हती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, संघटनेने यात्रा काढली जाईलच असा निर्धार व्यक्त केला. त्यानंतर प्रशासनाने अनुमती दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात्रा शांततेने काढली जाईल असे संघटनेने स्पष्ट केले आहे. या यात्रेच्या कालावधीत इंटरनेटवर अफवा पसरविल्या जाण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने 26 ऑगस्ट ते 28 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत इंटरनेट बंद ठेवण्याचा आदेश सर्व इंटरनेट कंपन्यांना दिला आहे. या निर्णयाला नूहच्या पंचायत समितीनेही मान्यता दिली असून यात्रा शांततेने पार पडण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. आणखीही काही संघटना सहभागी होण्याची शक्यता आहे.









