वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उकड्या तांदळाच्या निर्यातीवर केंद्र सरकारने 20 टक्के निर्यातकर लागू केला आहे. देशात या तांदळाचा पुरवठा पुरेसा रहावा आणि मोठ्या प्रमाणावर निर्यात होऊन देशात या तांदळाची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती केंद्रीय व्यापार विभागाने आपल्या निवेदनात दिली आहे.
25 ऑगस्टपासून हा निर्यातकर लागू झाला आहे. तो 16 ऑक्टोबर 2023 पर्यंत लागू राहणार आहे. 25 ऑगस्टपूर्वी जो उकडा तांदूळ सीमाशुल्क विभागाच्या बंदरांमध्ये आलेला आहे, तसेच ज्या तांदळाकडे वैध लेटर ऑफ क्रेडिट आहे अशा तांदळाच्या निर्यातीवर हा कर लावण्यात येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. उकड्या तांदळाच्या निर्यातीवर आता निर्यातकर लागू करण्यात आल्याने बासमती वगळता तांदळाचे सर्व प्रकार आता निर्यातकराच्या कक्षेत आले आहेत.
काही शेतकरी संघटनांनी या निर्यात शुल्कावर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, देशात तांदळाचे दर हाताबाहेर वाढू नयेत याची दक्षता घेणे केंद्र सरकारसाठी आवश्यक आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून विक्री करण्यासाठी तांदळाची खरेदी करण्याची योजना सुरळीत सुरु आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत एकंदर 15.54 लाख टन बिगर बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली आहे.









