वृत्तसंस्था / जयपूर
राजस्थानात सध्या लाल डायरी प्रकरण गाजत आहे. या डायरीमुळे राजस्थान सरकार किती भ्रष्टाचारी आहे याचा पर्दाफाश झाला आहे. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. ते राजस्थानातील गंगापूर येथे इफ्कोने आयोजित केलेल्या सहकार किसान सम्मेलनात बोलत होते.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. गेल्या 9 वर्षांमध्ये कृषी क्षेत्रासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये सहा पट वाढ झालेली आहे. एवढी वाढ इतक्या कमी कालावधीत आजवर कधीच झाली नव्हती. राजस्थानात मात्र काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचारामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. शेती क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी राज्य सरकारजवळ पैसा नाही. राज्य सरकार केवळ लाल डायरीच्या संकटापासून वाचण्यासाठी स्वत:ची शक्ती खर्च करीत आहे. सध्या गेहलोत यांना लाल रंगाची अत्यंत भीती वाटते. या लाल रंगाच्या डायरीत राजस्थान सरकारच्या भ्रष्टाचाराची अनेक गुपिते दडलेली आहेत. राजस्थानात विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे सरकार आल्यास या भ्रष्टाचाराची चौकशी केली जाणार आहे, असेही प्रतिपादन अमित शहा यांनी त्यांच्या भाषणात केले.
राजस्थानात या वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणूक होणार आहे. सध्या राज्यात काँग्रेसचे सरकार आहे. मात्र, दर पाच वर्षांनी सरकारमध्ये परिवर्तन करण्याची या राज्याची परंपरा आहे. त्यामुळे यंदा आपल्याला सत्ता मिळेल अशी आशा भाजपला वाटत असल्याने त्या पक्षाने येथे आतापासून जोर लावला आहे.









