आज आपला वावर इलेक्ट्रॉनिक युगात आहे. त्यामुळे अनेक नैसर्गिक वस्तूंपासून आपण दूर गेलो आहोत. तरीही लाकूड, काष्ठ, माती, दगड, खडक इत्यादी साधने आजही आपल्या उपयोगाचीच आहेत. अनेक कंपन्या आणि खासगी व्यक्ती निसर्गशेतीकडे झुकल्या असून रासायनिक खते आणि कीटनाशके यांच्या उपयोगाविना कृषी उत्पादने घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे गाईचे शेण अर्थात गोबर किंवा गोमय यांच्यावरही विविध प्रयोग होत असून त्यांची उपयुक्तता नव्याने सिद्ध होत आहे. सनराईजर्स नामक एक संस्था असे प्रयोग करीत आहे.
या संस्थेने लाकूड, गाईचे शेण आणि माती यांच्या साहाय्याने रेफ्रिजरेटरची निर्मिती करण्यात यश मिळविले आहे. हा फ्रिज आपल्या नेहमींच्या वीजेवर चालणाऱ्या फ्रिजसारखाच आहे आणि तो कामही तसेच करतो. या फ्रिजभोवती एक आवरण असून त्यात पाणी भरायचे असते. या पाण्यामुळे फ्रिज बनविण्यासाठी उपयोगात आणलेली माती थंड राहते आणि आतील पदार्थही बराच काळ ताजे राहतात. या फ्रिजला वीज लागत नाही. तसेच कूलिंग करणारा वायूही लागत नाही. त्यामुळे तो पर्यावरणाच्या दृष्टीने आदर्श आहे. त्याची किंमतही अवघी 1,500 रुपये, म्हणजे नेहमींच्या फ्रिजपेक्षा अतिशय कमीं आहे. जेथे वीजेची सोय नाही, अशा स्थानी तो उपयुक्त ठरु शकतो. सध्या हा चर्चेचा विषय बनला आहे.