अर्थमंत्री, क्रीडामंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन : दाबोळी विमानतळ बंद करणार नसल्याचे स्पष्ट
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन व केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेऊन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी केंद्राकडे अर्थसहाय्याची मागणी केली. दोन्ही मंत्र्यांनी त्याकरीता सर्वतोपरी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. याशिवाय डॉ. सावंत यांनी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, पर्यटनमंत्री रोहन खंवटे व राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांच्यासह केंद्रीय हवाई उ•ाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन दाबोळी विमानतळ चालू ठेवण्याची मागणी केली. त्यांनी दाबोळी विमानतळ बंद करणार नसल्याची ग्वाही दिली.
दाबोळी बंद करण्याचा प्रस्ताव नाही
तसेच या सर्व मंत्र्यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांना भेटून दाबोळी विमानतळाच्या विषयावर चर्चा केली. दाबोळी विमानतळ बंद करणार नाही आणि तसा कोणताही विचार, प्रस्ताव नसल्याचे सांगून तो नागरी हवाई सेवेसाठी यापुढेही खुला ठेवणार असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय क्रीडास्पर्धांसाठी भरीव मदत
राष्ट्रीय क्रीडास्पर्धाच्या आयोजनासाठी अर्थसहाय्य मिळावे म्हणून डॉ. सावंत यांनी दिल्लीत प्रयत्न केले. त्या स्पर्धाकरीता मोठा खर्च येणार असल्याने तसेच क्रीडा साधन-सुविधा विकसित करण्यासाठी खर्च करावा लागणार असल्याने त्यांनी वित्तमंत्री या नात्याने सितारामन यांच्याकडे मदतीसाठी साकडे घातले. सितारामन व ठाकूर यांना भेटून भरीव आर्थिक पाठिंब्याचे आश्वासन मिळवले आहे.
राज्याकडून 450 कोटींची तरतूद
या दोन्ही दौऱ्यात क्रीडामंत्री गोविंद गावडे यांचा सहभाग नव्हता. क्रीडा स्पर्धा आयोजनास उशीर झाला असून ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये सर्व तयारी होणे आवश्यक आहे. त्यासाठी मोठा खर्च करून महिन्याभरात सर्व साधन-सुविधांची तयारी गोव्याला करावी लागणार आहे. याची जाणीव झाल्यानेच डॉ. सावंत यांनी दिल्लीवारी केल्याचे दिसून आले आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पातून सदर क्रीडा स्पर्धासाठी रु. 450 कोटीची तरतूद केली असली तरी भांडवली खर्चासाठी निधी नसल्याने तो मिळावा म्हणून त्यांनी केंद्राकडे अर्थसहाय्याची मागणी केल्याचे समोर आले आहे.
कॅसिनो करवाढीवर विचार करण्याचे आश्वासन
डॉ. सावंत यांनी गोव्यातील विविध विकासकामे, प्रकल्पांबाबत सितारामन यांच्याशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी सढळ हस्ते मदत करण्याची ग्वाही त्यांना दिली. कॅसिनोमधील करवाढीचा विषयही सावंत यांनी त्यांच्या कानावर घातला. त्यावर फेरविचार करण्याचे आश्वासन सितारामन यांनी दिले आहे.
नौदलाचा बफर झोन कमी करावा : माविन
वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे नौदलाच्या बफर झोनचा विषय मांडला आणि स्थानिकांची सतावणूक होत असल्याचे त्यांच्या कानावर घातले. तो बफर झोन 50 मीटर्सने कमी करावा अशी सूचना गुदिन्हो यांनी सिंग यांना केली. तेव्हा नौदलाकडे संयुक्त बैठक घेवून हा विषय सोडवण्याचे आश्वासन सिंग यांनी त्यांना दिले.









